नगर- सीना नदीपात्रातील अतिक्रमण हटवण्यास सुरुवात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, नगर

नगर बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या सीना नदी पात्रातील अतिक्रमण हटवण्यास आजपासून सुरुवात झाली आहे. नगरचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आज प्रत्यक्ष या ठिकाणी हजर राहून पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी ही अतिक्रमणे काढली जाणार असून पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण होईल, अशा प्रकारच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

यावेळी प्रांताधिकारी उज्वला गाडेकर, तहसीलदार अप्पासाहेब शिंदे, कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी, अतिक्रमण विभागाचे प्रमुख सुरेश इथापे उपस्थित होते. सोमवारी सकाळी दहा वाजता येथील रेल्वे स्टेशन जवळील असलेल्या लोखंडी पुलाशेजारी नदीपात्रातील अतिक्रमण काढण्यास सुरुवात झाली.

नदीपात्रातील अतिक्रमणाबाबत प्रशासनाने सात दिवसांची नोटीस बजावली होती. त्याची मुदत संपल्यानंतर सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर कारवाई मोहीम सुरू करण्यात आली. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी म्हणाले की, बऱ्याच वर्षांपासून हा विषय तसाच होता. पावसाळ्यामध्ये पाणी नागरिकांच्या घरांमध्ये पाणी जात होते. अतिक्रमण वाढल्यामुळे नदीचे पात्रसुद्धा अरुंद झाले होते. त्यामुळे आम्ही ही मोहीम हाती घेतली आहे.” असं द्विवेदी यावेळी म्हणाले.

”पावसाळ्यापूर्वी अतिक्रमण काढले जाणार आहे तसेच गाळ काढण्याची मोहीम सुद्धा हाती घेतली आहे. पाच ते सहा किलोमीटर परिसरामध्ये हा गाळ टाकला जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांना गाळ घेऊन जायचं असेल त्यांनी तो घेऊन जावा असे आवाहनही आम्ही केले आहे,” अशी माहिती द्विवेदी यांनी दिली आहे.