
अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील युद्धावर स्पष्ट भूमिका न मांडणाऱया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज जोरदार टीका केली. ‘मोदी साहेब, आता मौन सोडा. काहीतरी बोला,’ असे आवाहन राहुल यांनी केले.
राहुल गांधी यांनी ‘एक्स’वर पोस्ट लिहून मोदींना हिंदुस्थानच्या सातत्यपूर्ण परराष्ट्र धोरणाची आठवण करून दिली. ‘नैतिकदृष्टय़ा हिंदुस्थानची भूमिका स्पष्ट असली पाहिजे. आंतरराष्ट्रीय कायदा आणि मानवी जिवांच्या रक्षणासाठी बोलण्याचे धाडस आपण दाखवले पाहिजे. सार्वभौमत्व आणि वादावर शांततापूर्ण तोडगा हा आपल्या परराष्ट्र धोरणाचा पाया आहे. त्यात सातत्य हवे,’ असे राहुल म्हणाले. ‘एखाद्या देशाच्या सार्वभौमत्वावर होणारे हल्ले धोकादायक ठरू शकतात. इराणवरील एकतर्फी हल्ले आणि इराणकडून आखातातील इतर देशांवर होणाऱया हल्ल्यांचा निषेध केला पाहिजे. हिंसाचार हिंसाचाराला जन्म देतो. संवाद आणि संयम हाच शांततेचा एकमेव मार्ग आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
खामेनींची हत्या मान्य आहे का?
‘नवी व्यवस्था आणण्यासाठी एखाद्या राष्ट्रप्रमुखाची हत्या होणे हे मान्य आहे का? खामेनींच्या हत्येला मोदींचा पाठिंबा आहे का, याचे उत्तर त्यांनी दिले पाहिजे. मोदींचे मौन जगात हिंदुस्थानची प्रतिष्ठा कमी करत आहे,’ असा हल्लाही राहुल गांधी यांनी चढवला.
























































