
बहुचर्चित असा आयपीएल 2022 चा लिलाव सुरू असताना एक अनपेक्षित घटना घडली आहे. ही लिलाव प्रक्रिया पार पाडणारे ह्यूज एडमीड्स बेशुद्ध होऊन पडल्याने एकच धावपळ उडाली. त्यानंत काही वेळासाठी लिलाव प्रक्रिया थांबवण्यात आली आहे.
श्रीलंकेचा फिरकीपटू हसरंगासाठी बोली सुरू असताना हा प्रकार घडला. त्याच वेळी सभागृहात मोठा आवाज झाला. पोडियमसमोर उभे असलेले ह्युज हे खाली कोसळले. सुरुवातीला काही क्षण कुणालाही काय झालं याची कल्पना आली नाही. काही क्षणांनी ह्युज कोसळल्याचं लक्षात आलं. रक्तातील साखर कमी झाल्याने ह्युज यांना भोवळ आली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.
या घटनेनंतर लिलाव प्रक्रियेत भोजनाचा अवकाश घोषित करण्यात आला. ह्युज यांच्यावर प्राथमिक इलाज करण्यात येत आहे. आता ही प्रक्रिया दुपारी 3.30 पासून सुरू होईल.
आत्तापर्यंत सर्वाधिक मोठी बोली श्रेयस अय्यरवर लावण्यात आली आहे. कोलकाता नाईट रायडर्सने त्याला 12.25 कोटींना विकत घेतले आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर हर्षल पटेल आहे. हर्षलला 10.75 कोटी रुपयांच्या बोलीवर राजस्थान रॉयल्सने विकत घेतलं आहे. ओपनर देवदत्त पडिक्कललाही बंगळुरुने 7.75 कोटींना खरेदी केले आहे.
नितीश राणाला 8 कोटी रुपयांना कोलकाताने खरेदी केलं आहे. माजी अफ्रिकी कॅप्टन फाफ डुप्लेसिसला 7 कोटींना बंगळुरुने विकत घेतलं आहे. त्याच्या मूल्यात 337 टक्क्यांनी वाढ नोंदवली गेली आहे. तर एक कोटींची बेस प्राईस असलेल्या मनिष पांडेला 4.6 कोटीमध्ये लखनौने खरेदी केले आहे. त्याचे मूल्य 58 टक्क्यांनी घटलं आहे.




























































