
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार वियान मुल्डरची सध्या क्रिकेट विश्वात जोरदार चर्चा सुरू आहे. त्याच कारणही तसंच आहे. झिम्बाब्वेविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात मुल्डरने नाबाद 367 धावांची खेळी केली. ब्रायन लाराचा 400 धावांचा विक्रम मोडण्याच्या अगदी जवळ तो पोहोचला होता. परंतु त्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देत डाव घोषित केला. ब्रायन लारा सुद्धा यामुळे आश्चर्यचकित झाले. खुद्ध मुल्डरने यासंदर्भात माहिती दिली आहे.
वियान मुल्डरने सुपर स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये ब्रायन लारा त्याला काय बोलले याची माहिती दिली आहे. तो म्हणाला की, “लारा यांनी मला सांगितलं की, जर तुझ्याजवळ संधी होती तर, तू 400 हून अधिका धावा केल्या पाहिजे होत्या. ते मला म्हणाले की, तु स्वत: तुझी कथा लिहित आहेस आणि त्याच्यावर मला गर्व आहे. तसेच ते पुढे म्हणाले की, विक्रम हे मोडण्यासाठीच असतात, त्या क्षणी तु ते करायला पाहिजे होतं.” असं मुल्डरने मुलाखतीमध्ये सांगितलं आहे. मुल्डरला ब्रायन लारा यांचा विक्रम मोडण्यासाठी अवघ्या 33 धावांची गरज होती. परंतु त्याने तसं केलं नाही.
मुलाखती दरम्यान त्याने विक्रम का मोडला नाही, याचे कारण सांगितलं आहे. “मी विचार केला आमच्या संघाकडे आता चांगल्या धावा आहेत. त्यामुळे आपण आता गोलंदाजीवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. दुसरे कारण म्हणजे लारा यांच्यासारख्या महान खेळाडूचा विक्रम मोडणे माझ्यासाठी आवश्यक नव्हते. त्यांचे नाव विक्रमाच्या यादीमध्ये असावे यासाठी ते पात्र आहेत. जर मला पुन्हा संधी मिळाली तर, कदाचित पुन्हा मी हाच निर्णय घेईन आणि त्यांचा विक्रम मोडणार नाही.” असे मुल्डर म्हणाला आहे.