
सामना प्रतिनिधी । लातूर
टेबलाखालून लाच देण्याचे प्रकार सुरू असले तरी आता लाखखोर ही अपडेट झाले असे म्हणण्याची वेळ आली आहे. कारण लातूरमध्ये चक्क मोबाईल अॅपवरून लाच स्वीकारण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. वीज चोरीचा गुन्हा दाखल न करण्याच्या कारणावरून दोन हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या एका व्यक्तीविरुद्ध अहमदपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ही रक्कम अॅपद्वारे स्वीकारण्यात आली.
अहमदपूर येथील संतोष माणिकराव धडे (राहणार थोडगा रोड) याने तक्रारदाराकडून दोन हजार रुपयांची लाच स्वीकारली. तक्रारदाराविरुद्ध वीज चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी साहेबांना सांगतो. त्या साठी दोन हजार रुपये लागतील असे म्हणून एका अॅपद्वारे ही रक्कम ऑनलाईन ट्रान्सफर करण्यास सांगितली. लाचेची रक्कम ऑनलाईन स्वीकारल्यानंतर तो फरार झाला. काम होत नाही हे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने यासंदर्भात पोलीस ठाण्यात धाव घेतली.

दरम्यान, उपअधिक्षक माणिक बेद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस निरीक्षक कुमार भगवान दराडे हे करीत आहेत. अहमदपूर पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



























































