दहावीच्या परीक्षेला रायटर देण्यासाठी विद्यार्थ्याकडे मागितली लाच; आठ हजार घेताना अधीक्षकाला रंगेहाथ पकडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दहावीच्या परीक्षेला रायटर देण्यासाठी विद्यार्थ्याकडे दहा हजारांची लाच मागणाऱ्या बोर्डाच्या सहाय्यक अधीक्षकाला एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. सुदाम चव्हाण (५७) असे या सहाय्यक अधीक्षकाचे नाव असून ते नवी मुंबई येथील महाराष्ट्र राज्य माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण मंडळात कार्यरत आहेत. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात चव्हाण यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार हे खासगी शिक्षक असून ते जिनियस लर्निंग सेंटर चालवतात. त्यांच्या सेंटरमधील दहावीच्या विद्यार्थ्याला पेपर लिहिण्यासाठी अडचण येत असल्याने त्यांनी त्याच्या आईला परीक्षेला रायटर मिळण्यासाठी अर्ज करण्यास सांगितले. मात्र आईने तक्रारदार शिक्षकांनाच अधिकार पत्र देऊन ही प्रक्रिया पूर्ण करण्याची विनंती केली. त्यानुसार ते वाशी येथील महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, मुंबई विभागीय कार्यालयात गेले असता तेथील कर्मचाऱ्यांनी त्यांना २०० रुपये भरून अर्ज करण्यास सांगितले. ही रक्कम भरण्यासाठी गेले असता सहाय्यक अधीक्षक सुदाम चव्हाण यांनी संबंधित विद्यार्थ्यास दहावीच्या परीक्षेला रायटर देण्यासाठी तसेच विषय बदलून हवा असेल तर दहा हजार रुपये द्या, अशी मागणी शिक्षकाकडे केली होती.

सापळा रचला आणि मुसक्या आवळल्या
शिक्षकाने दिलेल्या तक्रारीनुसारनवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाधीक्षक धर्मराज सोनके यांच्या पथकाने एसीबीचे ठाणे परिक्षेत्र अधीक्षक शिवराज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक भागवत सोनावणे व सुहास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वाशी येथील महाराष्ट्र राज्य माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कार्यलयात सापळा रचला. यावेळी तडजोडीअंती आठ हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीने सुदाम चव्हाण यांच्या मुसक्या आवळल्या. एसीबीने दिलेल्या तक्रारीवरून वाशी पोलिसांनी सुदाम यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.