नवऱ्याच्या साथीने नववधूने आईला चोपलं, हनिमूनची स्वप्न रंगवणाऱ्या जोडप्याची तुरुंगात रवानगी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एका जोडप्याच्या लग्नात घडलेल्या प्रकारामुळे नववधू-वराला तुरुंगाची हवा खावी लागली आहे. त्यामुळे हनिमूनची रात्र दोघांनाही तुरुंगातच काढावी लागली आहे. यावेळी तुरुंगात वराचा एक मित्र देखील होता. घडले असे कि, लग्नाच्या दिवशी काही कारणास्तव वधूने आपल्याच आईला मारहाण केली होती. हि मारहाण करताना वधूला वर आणि त्याच्या मित्रानेही साथ दिली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी वधू-वर आणि त्यांच्या साथीदाराला तुरुंगात पाठवले.

सदर घटना स्कॉटलंड येथे 2019 साली घडली होती. आता न्यायालयाने या प्रकरणी निकाल दिला असून यात लिव्हिंगस्टन शेरीफ कोर्टाने वधू- वर आणि त्यांच्या साथीदाराला मारहाण आणि दुखापत केल्याबद्दल दोषी ठरवले आहे.

‘द सन’च्या वृत्तानुसार 26 वर्षीय क्लेअर गुडब्रँड आणि 33 वर्षीय इमॉन गुडब्रँड यांच्या लग्नात हा सगळा गोंधळ उडाला होता. लग्नानिमित्त आयोजित केलेल्या पार्टीत पाहुण्यांनी खूप मद्यपान केले होते. दरम्यान, क्लेअर आणि तिची 47 वर्षीय आई चेरी-अॅन लिंडसे यांच्यात काही कारणास्तव भांडण झाले. यानंतर या भांडणाचे रूपांतर हाणामारीत झाले.

यावेळी क्लेअरने तिच्या आईला केस ओढून बूटाने मारहाण केली. तसेच श्वास गुदमरेपर्यंत तिची मान दाबली होती. तर इमॉन गुडब्रँड आणि त्याचा साथीदार किरन या दोघांनी क्लेअरचे वडील डेव्हिडवर देखील हल्ला केला. बॉक्सर असलेल्या इमॉनने डेव्हिडला जोरात मारहाण केली. इमॉन आणि किरनने लग्नातील इतर पाहुण्यांवर देखील हल्ला केला. मारहाणीची ही घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे.

मधुचंद्राच्या दिवशी वधू-वर तुरुंगात

या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. लिंडसे आणि इतरांच्या तक्रारीच्या आधारे, क्लेअर, तिचा नवरा इमॉन आणि इमॉनचा मित्र कायरन यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तिघांनाही तुरुंगात रात्र काढावी लागली.