पुलाच्या डागडुजीऐवजी हाती घेतले कठडय़ाचे काम

890

सुमारे पंधरा लाखांची तरतूद झाल्यानंतर सर्वप्रथम सावरकर पुतळय़ासमोरील पुलाचा पृष्ठभाग समान करून पूल हलक्या वाहनांसाठी उपलब्ध करून देणे महत्त्वाचे आहे, पण पृष्ठभाग सपाट करण्याऐवजी महापालिका प्रशासनाने पुलावरील संरक्षक कठडय़ाचे काम हाती घेतले. शहरातील बहुसंख्य रस्त्यांवर खड्डे निर्माण झाले आहेत. अशा परिस्थितीत प्राधान्यक्रमाने पृष्ठभागाचे काम घेण्याऐवजी संरक्षक कठडय़ाचे काम का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. येथील परिस्थिती पाहिल्यानंतर ‘बेंड आले कपाळावर, उपचार मात्र पायावर’ अशी खोचक प्रतिक्रिया नोंदवत नागरिक आपल्या भावना व्यक्त करीत आहेत.

यंदा ऑगस्टच्या दुसऱया आठवडय़ात पांझरेच्या उगमस्थानासह अन्य भागात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे अक्कलपाडा धरणाचे दरवाजे उघडून पाणी सोडण्यात आले. त्यात सावरकर पुतळय़ासमोरील पांझरेवरील पूल खिळखिळा झाला. पुलावरील संरक्षक कठडे आणि पथदिव्यांचे खांब वाहून गेले. पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला, परंतु रहदारीसाठी पुरेशी व्यवस्था नसल्याने लहान पूल तात्पुरत्या स्वरूपात दुरुस्त करून तो लहान वाहनांसाठी खुला व्हावा अशी मागणी नागरिकांची होती. त्यामुळे महापालिकेने पंधरा लाखांची तरतूद करून काम सुरू केले, परंतु पुलावरील खाचखड्डे असलेला पृष्ठभाग सपाट करण्याऐवजी पुलावरील संरक्षक कठडय़ांचे काम सुरू केले. सध्या परतीचा पाऊस सुरू आहे. त्यामुळे पुलावर ठिकठिकाणी डबकी साचली आहेत. डबक्यांचा अंदाज घेत-घेत पादचारी आणि लहान वाहनचालक पूल पार करण्याचा प्रयत्न करीत आहेत. अनेकदा खड्डय़ांचा अंदाज येत नसलेल्या प्रवाशांची या पुलावर फसगत होते. संरक्षक कठडय़ांचे काम करणारे कर्मचारी यावेळी हसतात. पुलावरील ही स्थिती पाहिल्यानंतर नागरिक संतप्त भावना व्यक्त करीत आहेत. महापालिकेचा कारभार म्हणजे ‘बेंड आले कपाळावर आणि उपचार मात्र पायावर’ अशी खोचक प्रतिक्रिया व्यक्त करीत नागरिक महापालिका प्रशासनाचा उध्दार करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या