
हिंदी सक्तीच्या विरोधात बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघही मैदानात उतरला आहे. मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून संघाने आपल्या तीव्र भावना मांडल्या आहेत. ‘एका पाहणीनुसार, प्राथमिक शाळांतील विद्यार्थी अजूनही सरळ-सोपं मराठी वाचताना अडखळतात. अशा स्थितीत हिंदी सक्ती करणे मुलांवर ताण आणणारे ठरेल. हिंदीला आमचा विरोध नाही, परंतु ज्या मुलांना अजून स्वतःची मातृभाषा समजत नाही, त्यांना इतर भाषांची सक्ती करणे योग्य नाही. सरकारने हिंदी तृतीय भाषा म्हणून ऐच्छिक ठेवावी. याउलट मराठीच्या उत्तम शिक्षणासाठी विविध उपक्रम राबवावेत, अशी विनंती संघाने पत्राद्वारे केली आहे.



























































