हिंदुस्थानला मालिका विजयासाठी हव्यात 324 धावा, यजमान कांगारूंना हवेत 10 बळी

हिंदुस्थान-ऑस्ट्रेलिया यांच्यामधील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेचा शेवट रोमहर्षक ठरणार हे पक्के झाले आहे. ब्रिस्बेन कसोटीच्या पाचव्या दिवशी अर्थातच मंगळवारी पावसाने व्यत्यय आणला नाही तर दोन्ही संघांमध्ये विजयासाठी चुरस पाहायला मिळू शकते. हिंदुस्थानला 2-1 अशा फरकाने मालिका जिंकण्यासाठी 324 धावांची आवश्यकता आहे. यजमान ऑस्ट्रेलियाला गावसकर-बॉर्डर करंडक पुन्हा आपल्याकडे आणण्यासाठी दहा बळी बाद करण्याची गरज आहे. आतापर्यंत या मालिकेत झालेल्या लढतींमध्ये दोन संघांमध्ये थरारक लढत पाहायला मिळाली आहे. त्यामुळे उद्याही याचीच पुनरावृत्ती होईल यात शंका नाही. पावसाचा व्यत्यय आल्यास लढत ड्रॉ होऊ शकते.

सिराजचा पदार्पणातच विक्रम

मोहम्मद सिराजने ऑस्ट्रेलियातील पदार्पणातील मालिकेमध्ये विक्रम नोंदवला. त्याने आतापर्यंत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत 13 फलंदाज बाद केले आहेत. याआधी ऑस्ट्रेलियामध्ये पहिलीच कसोटी मालिका खेळताना हिंदुस्थानकडून सर्वाधिक फलंदाज बाद करण्याची करामत जवागल श्रीनाथ याने केली होती. त्याने 1991-92 सालामध्ये 13 फलंदाज बाद केले होते. दत्तू फडकर यांनी 1947-48 साली 8 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला होता.

या कसोटीत हिंदुस्थान विजयी, ऑस्ट्रेलियाचा जय, ड्रॉ किंवा टाय यापैकी कोणताही निकाल लागू शकतो. ब्रिस्बेन कसोटीचा चौथा दिवस गाजवला तो युवा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज व मुंबईचा अष्टपैलू खेळाडू शार्दूल ठाकूर या दोघांनी. मोहम्मद सिराजने ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ 73 धावांमध्येच पॅव्हेलियनमध्ये पाठवला. पहिल्या डावात धडाकेबाज अर्धशतक झळकावणाऱया शार्दूल ठापूरने 61 धावांमध्ये चार फलंदाजांना बाद केले. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 294 धावांमध्ये आटोपला. हिंदुस्थानसमोर विजयासाठी 328 धावांचे आव्हान उभे ठाकले. टीम इंडियाने चौथ्या दिवसअखेरीस बिनबाद 4 धावा केल्या आहेत. रोहित शर्मा 4 धावांवर खेळत असून त्याच्यासोबत शुभमन गिल शून्यावर आहे.

स्मिथचे अर्धशतक

ऑस्ट्रेलियाकडून दुसऱया डावात बहुतांशी फलंदाजांनी छान सुरुवात केली पण कोणालाही मोठी खेळी करता आली नाही. अनुभवी स्टीवन स्मिथने सात चौकारांसह 55 धावांची खेळी साकारली. मार्पस हॅरीसने 38 धावांची, डेव्हिड वॉर्नरने 48 धावांची, मार्नस लाबुशेनने 25 धावांची, कॅमरून ग्रीनने 37 धावांची, कर्णधार टीम पेनने 27 धावांची आणि पॅट कमिन्सने नाबाद 28 धावांची खेळी केली.

67 धावा, सात बळी अन् दोन झेल

मराठमोळ्या शार्दूल ठाकूरने ब्रिस्बेन कसोटी सर्वार्थाने गाजवली असे म्हटले तरी यावेळी वावगे ठरणार नाही. त्याने या कसोटीत पहिल्या डावात 67 धावा फटकावल्या. तसेच पहिल्या डावात तीन आणि दुसऱया डावात चार असे मिळून सात फलंदाज बाद केले आणि दोन झेलही टिपले. अशी कामगिरी करणारा तो हिंदुस्थानचा पहिलाच खेळाडू ठरलाय हे विशेष.

युवा गोलंदाज चमकले

या कसोटीत हिंदुस्थानी गोलंदाजीची मदार युवा गोलंदाजांवर होती. चेंडू वरखाली राहणाऱया या खेळपट्टीवर टीम इंडियाच्या युवा ब्रिगेडने जबरदस्त गोलंदाजांनी केली. मोहम्मद सिराजने मार्नस लाबुशेन, स्टीवन स्मिथ, मॅथ्यू वेड, मिचेल स्टार्प व जोश हेझलवूड यांना बाद केले. शार्दूल ठापूरने मार्पस हॅरीस, पॅमरून ग्रीन, टीम पेन व नॅथन लायन यांना तंबूत धाडले. फिरकी गोलंदाज वॉशिंग्टन सुंदरने एक फलंदाज बाद केला.

संक्षिप्त धावफलक

ऑस्ट्रेलिया – पहिला डाव सर्व बाद 369 धावा
हिंदुस्थान – पहिला डाव सर्व बाद 336 धावा
ऑस्ट्रेलिया – दुसरा डाव सर्व बाद 294 धावा
(हॅरीस 38 धावा, वॉर्नर 48 धावा, स्मिथ 55, ग्रीन 37, सिराज 5/73, शार्दूल 4/61)
हिंदुस्थान – दुसरा डाव बिनबाद 4 धावा.

आपली प्रतिक्रिया द्या