महत्त्वाची बातमी; फायझरच्या लसीला ब्रिटनची मंजुरी! पुढच्या आठवड्यात टोचणार

अवघे जग ज्याची अतुरनेते वाट पहात आहे त्या कोरोनावरील लसीचे डोस प्रत्यक्षात टोचण्यात ब्रिटनमध्ये पुढील आठवडय़ात सुरुवात होणार आहे. फायझर-बायोएनटेकच्या लसीला मंजुरी देणारा ब्रिटन हा पहिला देश ठरला आहे. फायझरची लस 95 टक्के सुरक्षित असल्याचा दावा करण्यात आला आहे. या वर्षातील ही अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे.

फायझर-बायोएनटेकच्या लसीकरण योजनेच्या संयुक्त समितीचे प्रमुख, प्राध्यापक वेई शेन लिम आणि ब्रिटनच्या आरोग्य विभागाने ही महत्वपूर्ण घोषणा केली आहे. कोरोना महामारीने अवघ्या जगाला गेल्या 10 महिन्यांपासून वेठीस धरले. जगभरात साडेसहा कोटी लोकांना आतापर्यंत संसर्ग झाला. 14 लाख 90 हजारांवर कोरोना रुग्णांचा बळी आतापर्यंत कोरोनाने घेतला आहे. ब्रिटनमध्ये 59 हजारांवर लोकांचा मृत्यू झाला आहे.

कोणाला प्राधान्याने देणार

  • पुढील आठवडय़ात सुरू होणाऱया लसीकरण मोहिमेचा प्राधान्यक्रम ठरविण्यात आला आहे.
  • सध्या उपचार घेत असलेले कोरोना रुग्ण, ज्येष्ठ नागरिक, वृद्धाश्रमातील नागरिक, घरेलू कामगार, कोविड रुग्णालयातील डॉक्टर, नर्सेस आणि कर्मचारी, मधुमेह, रक्तदाब असलेल्या हाय रिस्क व्यक्ती यांना पहिल्यांदा लस देण्यात येणार आहे.
  • किमान वर्षभर ही मोहिम सुरू राहणार आहे. यापूर्वी लसीकरणाचा अनुभव ब्रिटनच्या प्रशासकीय यंत्रणेला आहे. त्यामुळे अडचण येणार नाही, असे आरोग्य विभागाने सांगितले.

दोन डोस देणार

  • पुढील आठवडय़ात ब्रिटनमध्ये लसीकरणाला सुरुवात होईल. n फायझरच्या लसीचे दोन डोस दंडावर टोचण्यात येणार आहेत. दोन डोसमध्ये 21 दिवसांचा कालावधी असेल. n 95 टक्के ही लस सुरक्षित आणि प्रभावी असल्याचा दावा केला आहे.
  • अमेरिकेच्या फायझर आणि जर्मनीतील बायोएनटेक या कंपन्यांनी संयुक्तपणे लस तयार केली आहे.

उणे 70 डिग्री तापमानात ठेवणार

फायझरची लस उणे 70 डिग्री तापमानात ठेवावी लागणार आहे. ब्रिटनला तत्काळ एक कोटी डोसची गरज आहे. त्यातील आठ लाख डोस पुढील आठवडय़ात मिळणार आहेत.

रशियातही लसीकरणाला सुरुवात होणार

रशियातही पुढील आठवडय़ापासून ऐच्छिक लसीकरणाला सुरुवात होणार आहे. रशियाने ‘स्पुटनिक व्ही’ ही लस तयार केली आहे. 20 लाख डोस तयार आहेत. मात्र, या लसीच्या अंतिम चाचणीबाबत स्पष्टता झालेली नाही.

लॉकडाऊन शिथिल होणार

ब्रिटनसह युरोपातील अनेक देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आहे. त्यामुळे अनेक भागात पुन्हा लॉकडाऊन करावा लागला. लसीकरण सुरु झाल्यास टप्प्या-टप्प्याने लॉकडाऊन शिथिल होईल.

आपली प्रतिक्रिया द्या