ब्रिटनमध्ये लसीकरणासाठी तरुण 1 किमी रांगेत उभे

ब्रिटनमध्ये कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येबरोबर मंदावलेल्या लसीकरण कार्यक्रमात आता तरुणांमुळे उत्साह संचारला आहे. देशातील 46.6 टक्के लोकसंख्येला लस दिल्यानंतर तरुणांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. 18 ते 20 वर्षीय तरुण लस घेण्यासाठी एक किमीच्या लांबच लांब रांगेत प्रतीक्षा करताना दिसून आले.

गेल्या शनिवारी पहिल्या दिवशी सात लाखांवर लोकांनी लसीकरणासाठी नोंदणी केली होती. ब्रिटनमध्ये प्रतितासामागे सुमारे 30 हजार लोकांना कोरोना लसीचा डोस दिला जात आहे. या रांगेत तरुणांबरोबरच वयस्करही आहेत.

लसीकरण झाल्यामुळे क्वारंटाईन होण्याची वेळ येणार नाही. ब्रिटनमध्ये पूर्वी फायझर, मॉडर्ना, अॅस्ट्राजेनेका या लसींचा तुटवडा होता. गेल्या आठवड्यात ब्रिटनमध्ये केवळ 4.5 लाख डोस देण्यात आले होते.

लसीकरण गतिमान होते, तेव्हा प्रतितास 12 लाखांवर डोस दिले जात होते. ब्रिटनमध्ये 18 जूनपर्यंत लसींचे नागरिकांना 7.3 कोटी डोस दिले गेले. त्यापैकी पहिल्या टप्प्यात 4.2 कोटी लोकांना पहिला डोस देण्यात आला. 3.11 कोटी लोकांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत. लसीकरणाच्या उत्पादनातून ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी दिली आहे.

ब्रिटनची अर्थव्यवस्था गतिमान

ब्रिटनची अर्थव्यवस्था अनलॉकनंतर वेगाने संकटातून बाहेर पडू लागली आहे. येथील बाजारपेठेत लोक खरेदीसाठी पूर्वीसारखी गर्दी करू लागले आहेत. लोकांना मोकळेपणाने आवश्यक वस्तुंची खेरदी विक्री करता येत आहे. लसीकरणामधून लोकांमध्ये विश्वास वाढीस लागला आहे.

त्यामुळे लोक विनासंकोच कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी करू लागले आहेत. गेल्या सहा महिन्यांत रोजगारात वाढ झाली आहे. मेपर्यंत 2.85 कोटी लोक पुन्हा पूर्वीच्या रोजगारावर परतले आहेत, असे एका पाहणीतून दिसून आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या