अरेच्या! रेस्टॉरेण्टमध्ये सापडली दातांची कवळी, विसराळू ग्राहकाला केले मालकाने आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अनेकदा कुठे बाहेर गेल्यावर अनावधाने वस्तू विसरण्याची चूक आपल्याकडून होते. मात्र ब्रिटनमध्ये एक व्यक्ती अशी काही गोष्ट विसरला की तो सोशल मीडियावर चर्चेचा विषय झाला आहे. ब्रिटनच्या एका रेस्टॉरेण्टमध्ये जेवायला गेलेली एक व्यक्ती चक्क आपले दात विसरुन आली आहे. विश्वास बसत नसेल ना पण ही गोष्ट खरीय. ब्रिटनच्या ओल्डम येथील रॉयटन येथे असलेल्या बार्कले पिझ्झा अॅण्ड प्रोसेको येथे ही घटना घडली असून चक्क रेस्टॉरन्ट मालकाने त्याबाबत सोशल मिडीयावर माहिती देत विसराळू ग्राहकाला ते घेऊन जाण्याचे आवाहन केले आहे, शिवाय ते त्यांच्याकडे सुरक्षित असल्याचेही सांगितले आहे.

हे प्रकरण ब्रिटनच्या ओल्डम येथील रॉयटन येथे असलेल्या बार्कले पिझ्झा अॅण्ड प्रोसेको रेस्टॉरेण्टचे आहे. ब्रिटनच्या एका रेस्टॉरेण्टमध्ये जेवायला गेलेल्या एका ग्राहक दाताची कवळी विसरला. रविवारी सकाळी रेस्टॉरेण्टचे सफाई कर्मचारी साफ करत असताना त्याला फरशीवर दातांची कवळी सापडली. या गोष्टीची माहिती त्याने मालकाला दिली आणि लागलीच मालकाने त्या ग्राहकाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्याचा मालकाचा पत्ता न लागल्याने अखेर रेस्टॉरेण्ट मॅनेजरने पूर्ण घटनेसह दातांच्या कवळीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. एम्मा व्हेलन असे या रेस्टॉरेण्ट मालकाचे नाव आहे.

या पोस्टमध्ये त्यांनी लिहीले आहे की, अश्या तर आम्हाला बऱ्याच गोष्टी सापडल्या आहेत. ज्यामध्ये घराची चावी, मोबाईल फोन, एक शूज अशाप्रकारच्या वस्तू आहेत. यामध्ये आता दाताची भर पडली आहे. हो दात. ही स्टोरी सोशल मीडीयावर प्रचंड व्हायरल होत असून लोकं पोस्ट पाचून वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.