ब्रिटनची हिंदुस्थानाला स्वातंत्र्यदिनाची भेट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । लंडन

हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यदिनाची भेट म्हणून लंडन मेट्रोपॉलिटन पोलिसांनी हिंदुस्थानी पुरातत्व खात्याला ६० वर्षांपूर्वी चोरीला गेलेली १२ व्या शतकातील दुर्मिळ बुद्धमूर्ती परत केली. तथागत भगवान गौतम बुद्धांची ब्रॉंझची चांदीचा कशिदा असलेली मूर्ती १९६१ साली बिहारच्या नालंदा येथील पुराणवस्तू संग्रहालयातून चोरीला गेली होती.ती लंडनमध्ये लिलावासाठी आली असताना स्कॉटलंड यार्ड पोलिसांच्या कला आणि पुराणवस्तू शोध विभागाने तिचा ताबा घेतला आणि १५ ऑगस्ट २०१८ रोजी इंग्लंडमधील हिंदुस्थानी राजदूत वाय. के. सिन्हा यांच्याकडे सुपूर्द केली.

६० वर्षांपूर्वी बिहारमधून चोरीला गेलेली भगवान बुद्धांची ही प्राचीन मूर्ती या वर्षीच्या मार्चमध्ये लंडनमध्ये आयोजित व्यापार मेळ्यात ठेवण्यात आली होती. या मूर्तीवर असोसिएशन फॉर रिसर्च इंटू क्राइम्स अगेंस्टच्या लिंडा अल्बर्टसन आणि इंडिया प्राइड प्रॉजेक्टचे विजय कुमार यांच्या नजरेस पडली .त्यांनी तात्काळ स्कॉटलंड यार्ड पोलिसांशी संपर्क साधला.स्कॉटलंड यार्डने ती मूर्ती ताब्यात घेऊन हिंदुस्थानी पुरातत्व खात्याला ( एएसआय ) परत करण्यासाठी हिंदुस्थानी राजदूतांकडे सोपवली. राजदूत सिन्हा यांनी त्याबद्दल ब्रिटनचे पर्यावरण आणि परंपरा मंत्री मायकेल एलिस व ब्रिटिश सरकारचे आभार मानले.