
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Boris Johnson) यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. हुजूर पक्षाच्या 41 मंत्र्यांनी बंडखोरी केल्यानंतर बोरिस जॉन्सन यांच्यावर दबाव राजीनामा देण्याचा दबाव वाढला होता. अखेर आज त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. परंतु नवीन पंतप्रधान रुजू होत नाही तोपर्यंत ते पदावर कायम राहतील असे वृत्त ‘आज तक’ने दिले आहे.
अर्थमंत्री ऋषी सूनक (Rishi Sunak) आणि आरोग्य मंत्री साजिद जावेद (Sajid Javid) यांनी मंगळवारी हिंदुस्थानी प्रमाणवेळेनुसार रात्री अकराच्या सुमारास त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. बुधवारी अर्थ सेवा मंत्री जॉन ग्लेन, सुरक्षा मंत्री रिचेल मॅक्लिएन, निर्यात आणि समानता मंत्री माईक फ्रीअर यांच्यासह 41 मंत्र्यांनी जॉन्सन सरकारवर अविश्वास व्यक्त केला आहे. तब्बल 41 मंत्र्यांनी राजीनामा दिल्यामुळे विरोधी मजूर पक्षाने बोरिस जॉन्सन यांचाही राजीनामा मागितला.
British PM Johnson announces resignation, says he’s sad to give up the best job in the world
— Press Trust of India (@PTI_News) July 7, 2022
लैंगिक शोषणाचे आरोप असलेल्या क्रिस पिंचर यांना बोरिस यांनी सरकारमध्ये सहभागी करून घेतल्याने वाद उफाळून आला होता. याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात जॉन्सन यांनी क्रिस पिंचर यांची हुजूर पक्षाच्या डिप्टी चिफ व्हीपपदी नियुक्ती केली होती. 30 जूनला ब्रिटश वृत्तपत्र ‘द सन’ने क्रिस पिंच यांनी लंडनच्या एका क्लबमध्ये दोन तरुणांना चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा दावा केला होता. विशेष म्हणजे पिंचर यांच्या त्याआधीही लैंगिक शोषणाचे आरोप झालेले आहेत.
‘द सन’च्या वृत्तानुसार क्रिस पिंचर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. मात्र जॉन्सन यांना पिंचर यांच्यावरील आरोपांची माहिती असतानाही त्यांनी त्यांची पक्षाच्या डिप्टी चिफ व्हीपपदी नियुक्ती केल्याने खासदारांनी नाराजी व्यक्त केली होती. 1 जुलैला सरकारच्या प्रवक्त्यांनी याबाबत पंतप्रधानांनी माहिती नव्हती असे सांगितले होते. परंतु तीनच दिवसांनी 4 जुलैला सरकारी प्रवक्त्यांनी याबाबत पंतप्रधानांनी माहिती होती असे सांगितले. तसेच हे आरोप सिद्ध न झाल्यामुळे त्यांच्या नियुक्तीत कोणताही अडथळा येत नसल्याचेही त्यांनी सांगितले होते.
परंतु खासदारांनी याला विरोध सुरुच ठेवला आणि सरकारमधील एकामागून एक मंत्र्यांनी राजीनामा देण्यास सुरुवात केली. आतापर्यंत 41 मंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

























































