
सामना ऑनलाईन । लखनऊ
पाकिस्तानी गुप्तहेर संघटनेला (आयएसआय) गोपनीय माहिती देणाऱ्या बीएसएफच्या जवानाला उत्तर प्रदेशच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) अटक केली आहे. अच्युतानंद मिश्रा असे त्या जवानाचे नाव आहे. आयएसआयच्या एका महिला एजंटने मिश्राला हनी ट्रॅपमध्ये अडकवून त्याच्याकडून गोपनीय माहिती मिळवली आणि आयएसआयला पुरवल्याचे एटीएसने सांगितले.
एटीएसच्या पथकाने मिश्राला नोएडाच्या सेक्टर १८ मधून बुधवारी अटक केल्याचे उत्तर प्रदेशचे डीजीपी ओमप्रकाश सिंह यांनी सांगितले. देशातील गोपनीय आणि संवेदनशील माहिती आयएसआयला पुरवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणी मिश्रा यांची चौकशी सुरू असल्याचेही ते म्हणाले. देशातील संवेदनशील ठिकाणे, अंतर्गत सूचना, बीएसएफ आणि लष्कराच्या प्रशिक्षण संस्था याबाबतची माहिती आयएसआय़ला दिल्याचे मिश्रा यांनी कबूल केले आहे. पाकिस्तानी हेर असलेल्या महिलेशी फेसबुकवरून ओळख झाल्याचे मिश्रा यांनी सांगितले. मिश्रा यांनी बीएसएफचे अनेक महत्वापूर्ण दस्तावेजही महिलेला दिल्याचे उघड झाले आहे. मिश्रा यांच्या बँक खात्याचीही माहिती मिळवण्यात येत आहे. आयएसआय़ला माहिती पुरवण्याच्या बदल्यात त्यांना पैसे मिळाले काय याची चौकशी करण्यात येत आहे. मिश्राच्या विरोधात देशद्रोह आणि संवेदनशील, गोपनीय माहिती उघड केल्याच्या आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सिंह यांनी सांगितले.

























































