
बीएसएनएल आणि एमटीएनएलला नवसंजीवनी द्यायचा प्रयत्न होत आहे. या दोन्ही सरकारी कंपन्यांनी टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथोरिटी ऑफ इंडिया (ट्राय) समोर एक प्रस्ताव पाठवला आहे. या प्रस्तावात 15 टक्के कमी शेअर असलेल्या कंपन्यांना फोन कॉल आणि डेटा मिनिमम रेटच्या नियमांत सवलत मिळण्याची मागणी केली आहे. म्हणजेच ग्राहकांना कॉल आणि डेटा फ्री देण्याचा त्यांचा विचार आहे, मात्र जिओ कंपनीने या प्रस्तावाला विरोध केला आहे.
कॉल आणि डेटाचा दर कमीत कमी किती असावा या मुद्दय़ावर ट्रायने टेलिकॉम कंपन्यांकडून सूचना मागवल्या आहेत. जिओने 1 जीबी डेटाचे किमान शुल्क 20 रुपये करण्याचा प्रस्ताव दिला आहे. तर व्होडाफोन, आयडियाचा 35 रुपये प्रतिजीबीचा प्रस्ताव आहे. भारती एअरटेलने 1 जीबी डेटासाठी 30 रुपये शुल्क आकारावे असा पर्याय दिला आहे. बीएसएनएल आणि एमटीएनएलचा कॉल, डेटा फ्रीचा प्रस्ताव आहे.
बीएसएनएलला पुनरुज्जीवन देण्यास सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही केंद्रीय दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद यांनी बुधवारी दिली.
डिसेंबर 2019 च्या आकडेवारीनुसार, मोबाईल सेवेत बीएसएनएलचे 10.26 टक्के तर एमटीएनएलचे 0.29 टक्के मार्केट शेअर आहेत. जिओचे मार्केट शेअर सर्वाधिक म्हणजे 32 टक्के आहेत.
सध्याच्या नियमानुसार टेलिकॉम कंपन्या कॉल आणि डेटा शुल्क निश्चित करू शकतात. मात्र मार्केटमध्ये स्पर्धा वाढल्याने या कंपन्यांनी दर निश्चितीत ट्रायला मध्यस्थी करायला सांगितलेली आहे. त्याप्रमाणे ट्रायने टेलिकॉम कंपन्यांकडून पर्याय-सूचना मागितल्या आहेत.





























































