
सामना ऑनलाईन । लखनौ
देशातील सर्वात मोठे राज्य उत्तर प्रदेशमध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मायावती यांचा बहुजन समाजवादी पक्ष आणि अखिलेख यादव यांचा समाजवादी पक्ष तब्बल 25 वर्षांचे वैर विसरून एकत्र आले आहे. याच दरम्यान मायावती यांचा 63 वा वाढदिवसही साजरा करण्यात आला. यावेळी मायावती यांनी काँग्रेस आणि भाजपवर जोरदार हल्ला चढवला.
मायावती म्हणाल्या की, ’12 जानेवारी रोजी आमच्या पक्षाने समाजवादी पक्षासोबत युती करत आगामी लोकसभा निवडणूक एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे आणि यामुळे भाजपची झोप उडाली आहे. उत्तर प्रदेश हे देशातील सर्वात मोठे राज्य असल्याने केंद्रात कोणाचे सरकार बनणार आणि पुढील प्रधानमंत्री कोण होणार हे निश्चित करेल.’ तसेच मायावती यांनी बसपा आणि सपाच्या कार्यकर्त्यांना जुने वाद विसरून एकत्र काम करण्याचे आवाहन केले आहे. युतीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा, हीच माझ्या वाढदिवसीची भेट असेल, असेही मायावती म्हणाल्या.
काँग्रेसच्या कर्जमाफीवर मायावतींचे प्रश्नचिन्ह
मायावती यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतून भाजपला नाही तर काँग्रेसला धडा घेण्याची गरज असल्याचे म्हटले. ‘लोकांना आकर्षित करणाऱ्या खोट्या आश्वासनांवर कोणताच पक्ष टीकू शकत नाही. तीन राज्यांमध्ये काँग्रेसचे सरकार आल्यानंतर देण्यात आलेल्या कर्जमाफीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. काँग्रेसने शेतकऱ्याच्या कर्जमाफीची सीमा 31 मार्च 2018 ठेवली परंतु त्यांचे सरकार 17 डिसेंबर 2018 ला अस्तित्वात आले. तसेच काँग्रेसने शेतकऱ्यांची फसवणूक करत फक्त 2 लाखांपर्यंत कर्जमाफी दिली. शेतकरी बँकांसह सावकारांकडूनही कर्ज घेतात याबाबतही सरकारने निर्णय घेण्याची गरज आहे’, असेही त्या यावेळी म्हणाल्या.
BSP Chief Mayawati in Lucknow: We have always worked for the poor and the down trodden. The government should give 100% farm loan waiver else farmer suicides will continue. A strong farm loan waiver policy should be made. pic.twitter.com/nRvA8K81SD
— ANI UP (@ANINewsUP) January 15, 2019




























































