
सामना प्रतिनिधी, नाशिक
महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी गुरुवारी स्थायी समिती सभेत सभापती हिमगौरी आडके यांना सन 2019-20 या आर्थिक वर्षाचा 1894 कोटी 50 लाख रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. नगरसेवकांना प्रत्येकी 39 लाख रुपयांचा विकासनिधी, शहरात दोन उड्डाणपूल, शहर बससेवा यासह रस्तेविकासासाठी ही तरतूद करण्यात आली आहे.
स्थायी समितीची सभा आज सभापती हिमगौरी आडके यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी सुरू झाली. पुलवामा हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली अर्पण करून दहा मिनिटांसाठी सभा तहकूब करण्यात आली. यानंतर आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सभापतींना अर्थसंकल्प सादर केला. 1894 कोटी 50 लाख जमा, 1893 कोटी 64 लाख खर्च आणि 85 लाख 68 हजार रुपये शिलकीचा हा अर्थसंकल्प आहे. शासन अनुदान, प्रत्यक्ष उत्पन्न यांची सांगड घालून समतोल विकास साधणारा हा वास्तववादी अर्थसंकल्प असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. नगरसेवकांना नियमानुसार 2 टक्के म्हणजे नऊ लाख रुपये व प्रभाग समितीत तीस लाख असा एकूण 39 लाखांचा विकास निधी देण्यात आला आहे. मात्र, पाच लाखापर्यंतचेच काम हे प्रभाग समितीवर मंजूर होईल, त्यापुढील खर्चाच्या विकासकामाला अंतिम मंजुरी ही नियमानुसार महासभेतच घ्यावी लागणार आहे.
अंदाजपत्रकात आणखी वाढ होण्याची शक्यता
रविवार कारंजा व मायको सर्कल येथील वाहतूककोंडीवर पर्याय म्हणून उड्डाणपुलासाठीच्या प्राथमिक कार्यवाहीला काही रक्कमेची तरतूद करण्यात आली आहे. शहर बसवाहतुकीसाठी 35 कोटींची, शैक्षणिक सुविधांसाठी 88 कोटी, दिव्यांगांसाठी प्रशिक्षण उभारणीसाठी 17 कोटी, मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते यासह बांधकाम विभागासाठी 305 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. स्थायी समितीतील चर्चेनंतर महासभेत या अंदाजपत्रकाला अंतिम मंजुरी मिळणार आहे. सदस्यांच्या अपेक्षा व सूचनांमुळे अंतिमतः हे अंदाजपत्रक आणखी वाढण्याची शक्यता आहे.




























































