
सामना प्रतिनिधी । मालवण
मालवण शहरातील रेवतळे सागरी महामार्ग परिसरातील एका बागेत वीज वाहिनीच्या धक्क्याने अजित फाटक या शेतकर्याची म्हैस दगावली. ही घटना सोमवारी सकाळी दहा वाजण्याच्या दरम्यान उघडकीस आली.
सोमवारी सकाळी सागरी महामार्गावरून जाणार्या वीज वितरणाच्या कर्मचार्यांना हरिश्चंद्र नरे यांच्या बागेत म्हैस दगावल्याचे दिसले. त्यांनी या घटनेची माहिती तेथील काही नागरिकांना दिली. म्हैशीचे मालक अजित फाटक, नगरसेवक दीपक पाटकर, सामाजिक कार्यकर्ते उमेश मांजरेकर, गणेश गावकर, मुन्ना फाटक, नीलेश शिरोडकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस कर्मचारी संतोष गलोले, महाडिक यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला.
दरम्यान, वीज महावितरणचे अधिकारी श्री. भुजबळ यांनी घटनेची माहिती घेतली. म्हशीच्या मृत्यू मुळे शेतकरी अजित पाटकर यांचे मोठे नुकसान झाले आहे. अजित पाटकर या शेतकर्याला महावितरणने त्वरीत नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नगरसेवक दीपक पाटकर यांनी केली.




























































