बुलढाणा जिल्ह्याने संधी दिल्यामुळेच बाला रफिक शेख ठरला महाराष्ट्र केसरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बुलढाणा | राजेश देशमाने 

सोलापूरच्या बाला रफिक शेखला बुलढाणा जिल्ह्याकडून महाराष्ट्र केसरी कुस्तीसाठी खेळू देण्याची विनंती सोलापूर कुस्तीगीर संघटनेने व बाला रफिक शेखच्या चाहत्यांनी बुलढाणा जिल्हा कुस्तीगीर संघटनेकडे केली होती. ही विनंती मान्य केल्यामुळे बाला रफिक शेख महाराष्ट्र केसरी ठरू शकला.

सोलापूर जिल्ह्यातून महाराष्ट्र केसरी स्पर्धेत खेळण्यासाठी पाच कुस्तीपटू होते. बुलढाणा जिल्ह्यातून कोणताच कुस्तीपटू महाराष्ट्र केसरी खेळण्यासाठी नव्हता. अशावेळी बुलढाणा जिल्ह्याची जागा मोकळी होती. हे हेरुन सोलापूर कुस्तीगीर परिषदेने बुलढाणा जिल्हा कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष गोकुलचंद सानंदा व सचिव रणजित बयस यांना बाला रफिक शेख याला बुलढाण्याकडून खेळू द्या अशी विनंती केली. ही विनंती बुलढाणा जिल्हा कुस्तीगीर परिषदेने मान्य करुन बाला रफिक शेख याला बुलढाणा जिल्ह्याकडून महाराष्ट्र केसरीसाठी उतरविण्यात आले आणि आज जालना येथे झालेल्या महाराष्ट्र केसरीत अंतीम लढतीत बाला रफिक शेख या मातीवरच्या मल्लाने पुण्याच्या अभिजीत कटके वर ११:३ ने धुळ चारीत महाराष्ट्र केसरीचा मानकरी ठरला. बुलढाणा जिल्हा कुस्तीगीर परिषदेने संधी दिल्याने बाला रफिक शेख हा महाराष्ट्र केसरी ठरू शकला.