बुलढाणा – एकाच कुटुंबातील 5 जणींचे मृतदेह आढळले, मृतांमध्ये 1 वर्षाच्या चिमुरडीचा समावेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मेहकर तालुक्यातील माळेगाव येथील एका मातेचा व तिच्या चार मुलींचा मृतदेह सोमवारी पहाटे एका विहिरीत आढळून आला. या घटनेमुळे खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. उज्वला बबन ढोके असे आईचे तर वैष्णवी (9), दुर्गा (7), आरूषी (4) व पल्लवी (1) अशी चार मुलींची नावे आहेत.

जानेफळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माळेगाव येथील उज्वला बबन ढोके हिच्या पतीने अंदाजे एक ते दिड महिन्यापूर्वी विष प्राशन करून आत्महत्या केली होती. त्यानंतर उज्वला ही तिच्या चार मुलीसोबत माळेगाव येथेच राहत होती. रविवारी चार मुलींना सोबत घेऊन ती मारोती पेठ शिवारात शेती कामासाठी गेली होती. सायंकाळी अंदाजे चार वाजता ती सोबतच्या महिलांना लवकर घरी जाते म्हणून निघून आली. तिने चार मुलींना एका विहिरीत ढकलून स्वतः आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. तिच्या नातलगांनी काल रात्रीपासून तपास सुरू केला असता आज विहिरीत हे पाच जणांचे प्रेत दिसले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अधिक तपास जानेफळ पोलीस करीत आहे.