
राजेश देशमाने। बुलढाणा
शिवसेना नेते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज सिंदखेडराजा येथे लखुजीराव जाधव यांच्या राजवाड्यातील माँ जिजाऊंच्या जन्मस्थळाचे दर्शन घेतले.
युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे आज मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यात आगमन झाले. सकाळी साडेअकरा वाजता ठाकरे सिंदखेडराजा येथील लखुजीराव जाधव यांच्या राजवाड्याच्या प्रवेशद्वारावर पोहोचताच शिवसेना युवासेनेच्या वतीने ढोलताशाच्या गजरात फटाक्यांची आतषबाजी करत शिवसेना जिंदाबाद युवासेना जिंदाबादचे नारे देत प्रचंड जल्लोषात त्यांचे स्वागत करण्यात आले. बाल शिवबासह असलेल्या माँ जिजाऊंच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करत आरती करुन त्यांनी पाच मिनिटे आपला माथा जिजाऊ चरणी टेकवून जिजाऊंचे आशिर्वाद घेतले. यावेळी त्यांच्यासमवेत युवासेना कोअर कमिटी सदस्य सिद्धेश कदम व पवन जाधव उपस्थित होते. तसेच युवासेनेचे जिल्हा अधिकारी ऋषी जाधव, माजी आमदार विजयराज शिंदे, सहसंपर्क प्रमुख भास्करराव मोरे, तालुका प्रमुख शिवाजी ठाकरे, निरज रायमूलकर, श्रीनिवास खेडेकर, वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष संजय हाडे, उपस्थित होते. यावेळी त्यांनी राजवाड्याबाहेरच पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.
राजवाड्याची पाहणी करत असतानाच शिवसैनिक योगेश म्हस्के यांनी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना माहिती दिली की, दरवर्षी शिवसेनेतर्फे व सिंदखेडराजा वासियांच्या वतीने जानेवारी महिन्यात पौष पौर्णिमेला जिजामाता जन्मोत्सव साजरा करण्यात येतो. यावर्षी जिजामाता जन्मोत्सवाच्या महापुजेला आपण यावे असे आग्रहाचे लेखी निमंत्रण यावेळी सिंदखेडराजा जनतेच्या वतीने अतिष तायडे, युवासेना तालुकाप्रमुख शिवप्रताप ठाकरे, योगेश म्हस्के व त्यांच्या शिष्टमंडळाने दिले. या निमंत्रणाचा स्वीकार आदित्य ठाकरे यांनी केला.
१९९५ ला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी भेट दिल्यानंतर राजवाडा व सिंदखेडराजा परिसराचा कायापालट झाला होता. त्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुद्धा भक्ती-शक्ती संगम सोहळा व शिवसेनेच्या प्रचारार्थ अनेकवेळा येऊन दर्शन घेतले. आदित्य ठाकरे यांनी प्रथमच बुलढाणा जिल्ह्यात आले असताना माँ जिजाऊंचा आशिर्वाद घेऊन विदर्भ दौर्याला सुरुवात केली.

































































