
शेतकऱयांना सरसकट कर्जमाफी मिळालीच पाहिजे, या मागणीसाठी शिवसेना आक्रमक झाली आहे. या मागणीसाठी आज बुलढाण्यात शिवसैनिक शेतकऱयांसह गनिमी काव्याने जिल्हा नियोजन बैठकीतच घुसले. शेतकऱयांना कर्जमाफी मिळालीच पाहिजे, अतिवृष्टीग्रस्तांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत द्या, भरपाईची मदत तातडीने त्यांच्या खात्यात जमा करा, अशा जोरदार घोषणांनी यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय दणाणले. शिवसैनिक आणि शेतकऱयांचे ते उग्र रूप पाहून बैठकीला उपस्थित पालकमंत्री आणि सहपालकमंत्रीही हादरले.
बुलढाणा जिह्यातील शेतकऱयांची शेती आणि संसार अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झाले आहेत. नियमांची अडचण सांगत सरकारने अद्याप त्या शेतकऱयांच्या खात्यात मदत जमा केलेली नाही. त्यामुळे शेतकऱयांमध्ये प्रचंड संताप आहे. आज बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात राज्याचे मदत, पुनर्वसन मंत्री व पालकमंत्री मकरंद पाटील आणि सहपालकमंत्री संजय सावकारे यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात जिह्यातील सर्व लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, गजानन वाघ, शिवसेनेच्या राज्य प्रवक्ता जयश्री शेळके, जिल्हा समन्वयक संदीप शेळके यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर चढून या बैठकीत आत उडी मारण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यासोबत शेतकरीही मोठय़ा संख्येने होते. विधानसभा संघटक सुनील घाटे यांना गेटवरून आत उडी मारत असताना पोलीस व शीघ्र कृती दलाच्या जवानांनी रोखले. यावेळी वातावरण तणावपूर्ण झाले होते. वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांनी सामोपचाराची भूमिका घेत शिवसैनिक आणि शेतकऱयांच्या शिष्टमंडळाला पालकमंत्री पाटील यांची भेट घालून देण्याची तयारी दर्शविली. त्यानंतर शिवसैनिकांनीही संयमी भूमिका घेतली.
यानंतर शिवसैनिक आणि शेतकऱयांच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली. शिष्टमंडळाने शेतकऱयांच्या सर्व मागण्या तातडीने पूर्ण कराव्यात आणि नुकसानभरपाई त्यांच्या खात्यात जमा करावी, अशी आग्रही मागणी यावेळी शिष्टमंडळाने केली. त्यावर शेतकऱयांना सर्वतोपरी मदत दिली जाईल असे आश्वासन पाटील यांनी दिले.