
बल्गेरियाचा क्रिकेटपटू मनन बशीर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका षटकात सलग सहा षटकार मारणारा सहावा फलंदाज ठरला आहे. यष्टिरक्षक फलंदाज असलेल्या मननने सोफियामधील तिरंगी टी-20 क्रिकेट स्पर्धेत जिब्राल्टरविरुद्धच्या अंतिम सामन्यात हा करिश्मा केला.
बल्गेरियाच्या डावातील 16 व्या षटकांत मनन बशीरने इस्सा झारूसह खेळताना उत्पृष्ट खेळी केली. जिब्राल्टरच्या कबीर मीरपुरीच्या षटकात मननने सलग सहा षटकार मारत वादळी खेळी साकारली. त्याच्या या स्फोटक खेळाच्या जोरावर बल्गेरियाने सहज विजयावर शिक्कामोर्तब केला. जिब्राल्टर संघाने प्रथम फलंदाजी करताना 9 बाद 194 धावसंख्या उभारली होती. बल्गेरियाने मनन बशीरच्या 9 चेंडूंतील नाबाद 43 धावांच्या वादळी खेळीच्या जोरावर 16.3 षटकातच विजयाला गवसणी घातली. इस्सा झारूनेही 42 चेंडूंत 87 धावांची नाबाद खेळी करीत विजयात मोलाची भूमिका बजावली. याचबरोबर हर्शल गिब्स, युवराज सिंग, कायरॉन पोलार्ड, जसकरण मल्होत्रा आणि दीपींद्र सिंग ऐरी यांच्यानंतर मनन बशीर हा एका षटकात सहा षटकार ठोकणारा सहावा आंतरराष्ट्रीय फलंदाज ठरला.
एकाच षटकात 6 षटकार ठोकणारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू
- हर्शल गिब्स विरुद्ध नेदरलँड्स, 2007
- युवराज सिंग विरुद्ध इंग्लंड, 2007
- कायरॉन पोलार्ड विरुद्ध श्रीलंका, 2021
- जसकरण मल्होत्रा विरुद्ध पापुआ न्यू गिनी, 2021
- दीपींद्र सिंग ऐरी विरुद्ध कतार, 2024
- मनन बशीर विरुद्ध जिब्राल्टर, 2025