
सामना ऑनलाईन, सटाणा
सध्याच्या आधुनिकीकरणाच्या युगात शेतातील सर्जा-राजाची जागा ट्रक्टरने घेतली आहे. शेतीची सर्वच कामे आता ट्रक्टरच्या सहाय्याने होत असल्यामुळे शेतात बैलजोडी पाहावयास मिळत नाही, मात्र आजही काही शेतकरी या गोष्टीला अपवाद ठरत आहेत. नामपूर बाजार समितीत एका शेतकऱयाने दोन लाखांची बैलजोडी खरेदी करून ट्रक्टरला मात दिली आहे.
नामपूर (ता. सटाणा) येथे बाजार समितीच्या आवारात दर बुधवारी भरणारा बैल बाजार संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. या ठिकाणी मध्य प्रदेश, गुजरात, अहमदनगर अशा विविध ठिकाणांहून व्यापारी बैल विक्रीसाठी येत असतात. बैल बाजाराच्या माध्यमातून लाखोंची उलाढाल होत असते. बैल बाजाराच्या पूर्व संधेला अशीच एक सर्जा-राजाची जोडी मार्केटमध्ये लाखोंचा भाव खाऊन गेली. चंदनपुरी येथील शेतकरी विठोबा देवरे यांनी आपली जुनी बैलजोडी देऊन वरून तब्बल एक लाख एक हजार रुपये देत गाळणे येथील व्यापारी रत्नाकर सोनवणे यांच्याकडून खिल्लारी जोडी विकत घेतली. जुनी जोडी व वरून एक लाख रुपये दिल्याने जोडीची किंमत जवळपास दोन लाख रुपयांच्या घरात गेली. या वेळी बैलजोडीवर गुलाल उधळत उपस्थित सर्वांनी फेटे बांधून आनंद व्यक्त केला. दिवसेंदिवस वाढत जाणाऱया पेट्रोल-डिझेलच्या दरामुळे आता ट्रक्टरदेखील परवडत नसल्याने शेतकरी पुन्हा पारंपरिक बैलजोडीकडे वळल्याचे यानिमित्ताने दिसून आले.
बैल बाजार आता पूर्वीसारखा राहिलेला नाही. परंतु काही शेतकरी याला अपवाद आहेत. आवडीची बैलजोडी घेण्यासाठी शेतकरी आजही किंमत मोजायला तयार असतात- रत्नाकर सोनवणे, व्यापारी


























































