
सर्व राज्यांतील बेकायदा बांधकामांवर बुलडोझर चालवण्याची कारवाई एकाच वेळी रोखली जाऊ शकत नाही. जर कुठे अवैध बांधकाम आढळले तर तिथले स्थानिक प्रशासन कारवाई करेल. याबाबत आम्ही अंतरिम सर्वव्यापी आदेश देणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिला. याचवेळी विविध राज्यांतील बेकायदा बांधकामावरील कारवाईला स्थगिती देण्यास न्यायालयाने स्पष्ट नकार दिला.
उत्तर प्रदेशातील बुलडोझर कारवाईविरोधात जमियत उलेमा-ए-हिंदने याचिका दाखल केली आहे. त्या याचिकेवर बुधवारी न्यायमूर्ती बी. आर. गवई आणि न्यायमूर्ती पी. एस. नरसिम्हा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. खंडपीठाने या प्रकरणातील सर्व पक्षकारांना युक्तिवाद पूर्ण करण्यास सांगितले. यावेळी याचिकाकर्त्या संस्थेतर्फे ज्येष्ठ वकील दुष्यंत दवे यांनी बाजू मांडली. आम्ही कायद्याला बांधील आहोत. एखाद्यावर गुन्हा दाखल झाला म्हणून त्याचे घर पाडणे हे आपल्या समाजात मान्य नाही. दंगलीतील आरोपींवर सरकार जाणीवपूर्वक कारवाई करतेय, असा आरोप ऍड. दवे यांनी केला. आसाममध्ये एका व्यक्तीचे घर पाडण्यात आले, कारण तो हत्येच्या गुह्यात आरोपी होता. पोलीस अधिकारी कुणाला शिक्षा देण्यासाठी अशा प्रकारे कुणाचे घर पाडू शकत नाहीत, असा युक्तिवाद ऍड. दवे यांनी सुनावणीवेळी केला. त्याची दखल न्यायालयाने घेतली.
न्यायालयाने नोंदवलेली महत्त्वपूर्ण निरीक्षणे
- वेगवेगळय़ा राज्यांतील हिंसाचारात सामील आरोपींच्या अवैध बांधकामांवरील पाडकामाची कारवाई रोखण्यासाठी आम्ही सर्वव्यापी आदेश देऊ शकत नाही.
- जर कुठे अवैध बांधकाम आढळून आले तर त्यावर कायद्याला धरून कारवाई करण्यास आम्ही तिथल्या स्थानिक प्रशासनाला अडवू शकत नाही.
- पाडकामाच्या कारवाईत कायद्याचे पालन झालेच पाहिजे. यात कुठलीही शंका नाही.
- स्थानिक अधिकाऱयांना कारवाई करण्यापासून रोखण्यासाठी असा कोणताही आदेश देणार नाही, जो सर्वत्र लागू होईल.































































