
सामना प्रतिनिधी । अलिबाग
पंजाब नॅशनल बँकेला 13,500 कोटींचा चुना लावून विदेशात फरार झालेला हिरे व्यापारी निरव मोदी याच्या याच्या अलिबागमधील किहीम येथील आलिशान बंगल्यावर जिल्हा प्रशासनाकडून लवकरच बुलडोझर फिरविण्याची कारवाई करण्यात येणार आहे. निरव मोदी याच्या बंगल्यातील सामान सक्तवसुली संचालनालय विभागाने आधीच काढून नेले आहे. तर बंगल्याच्या आत पोलीस, महसूल, बांधकाम विभागाचे कर्मचारी हजर झाले असून बंगला पाडण्यासाठीची मशिनरी बंगल्याच्या परिसरात आणून ठेवली आहे. त्यामुळे लवकरच निरव मोदी यांच्या बंगल्यावर हातोडा पडणार हे नक्की.
जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी निरव मोदी याच्या बंगल्यावर येऊन पाहणी केली आहे. निरव मोदी याने पंजाब नॅशनल बँकेला हजारो कोटींचा गंडा देऊन परदेशात पलायन केले आहे. त्यानंतर सक्तवसुली संचालनालयाने निरव मोदी याचा किहीम येथील बंगला सील केला होता. निरव मोदी याचा किहीम येथील बंगला सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करून बांधलेला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून कारवाई करण्यात येणार होती. मात्र हा बंगला ईडीने जप्त केल्याने कारवाई करण्यास अडचण येत होती. ईडीने आता हा बंगला जिल्हा प्रशासनाकडे दिला आहे. त्यामुळे आता जिल्हा प्रशासनाकडून बंगल्यावर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
ईडीने निरव मोदी यांच्या बंगल्यातील वस्तू दोन दिवसांपूर्वीच कंटेनर भरून हलविले आहे. त्यामुळे निरव मोदी याचा बंगला पडण्याची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाकडून सुरू झाली असून आज महसूल, बांधकाम, पोलीस विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यामुळे निरव मोदी यांचा बंगला लवकरच जमीनदोस्त होणार आहे.

























































