बुलेट ट्रेनला कोरोनाचा ब्रेक! प्रकल्प 2023 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता कमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्काकांक्षी  प्रकल्प असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या कामाला कोरोनामुळे ब्रेक लागला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भूसंपादन प्रकियेत येणाऱ्य़ा अडचणी, निविदा उघडण्यास होणारा उशीर आदी कारणांमुळे 2023 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता कमीच असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्य़ांनी दिली आहे.

मुंबई-अहमदाबाद या मार्गावर धावणाऱ्य़ा बुलेट ट्रेनसाठी महाराष्ट्रातील पालघर आणि गुजरातमधील नवसारी भागातील जमीन संपादन करण्यात येणार आहे. या प्रकल्पास जमीन देण्यास काही ठिकाणी गावकऱ्य़ांचा विरोध होत आहे. त्यातच कोरोनामुळे भूसंपादनाची प्रक्रिया मागील काही महिन्यांपासून रखडली आहे. विविध कामांसाठी नऊ निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यादेखील उघडल्या गेलेल्या नाहीत. यामुळे डिसेंबर 2023 पर्यंत या प्रकल्पाचे काम पूर्ण होण्याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.

नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशनने या प्रकल्पासाठी आतापर्यंत 63 टक्के जमीन ताब्यात घेतली आहे. त्यात गुजरातमधील सुमारे 77 टक्के जमीन, दादरा-नगर हवेलीमध्ये 80 टक्के आणि महाराष्ट्रातील 22 टक्के जमिनीचा समावेश आहे.

तीन ते सहा महिन्यांत नेमकी स्थिती कळेल

कोरोनामुळे टेंडर प्रक्रिया आणि जमीन संपादनाचे काम थोडे रखडले आहे हे जरी खरे असले तरी येत्या तीन ते सहा महिन्यांत जमीन संपादनाची नेमकी स्थिती स्पष्ट होईल. आवश्यक जमीन ताब्यात आल्याशिवाय प्रकल्प पुढे रेटता येत नाही असे सांगत रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष विनोद कुमार यादव यांनी कोविडची परिस्थिती निवळताच टेंडर प्रक्रिया सुरू करणार असल्याचे म्हटले आहे. त्यानंतर तीन ते सहा महिन्यात जमीन संपादनाची स्थिती स्पष्ट होईल,  असे यादव यांनी स्पष्ट केले.