
बहुचर्चित मुंबई-अहमदाबाद ‘बुलेट ट्रेन’ प्रकल्पासाठी लागणारी 1380 हेक्टर जमीन अद्याप पूर्णपणे अधिग्रहित झालेली नाही. मात्र आणखी सहा कॉरिडोर येथे ‘बुलेट ट्रेन’ धावण्याची योजना सरकारने आखली आहे. यामध्ये मुंबई-पुणे-हैदराबाद आणि मुंबई-नाशिक-नागपूर मार्गाचा समावेश आहे.
रेल्वे बोर्डाचे चेअरमन व्ही. के. यादव यांनी पत्रकारांना याबाबत माहिती दिली. रेल्वेने हायस्पीड आणि सेमी हायस्पीड रेल्वे कॉरिडोरसाठी सहा मार्ग निश्चित केले असून या योजनेचा डीपीआर एक वर्षात पूर्ण करण्यात येईल, असे यादव यांनी सांगितले.
काय आहे योजना
- हायस्पीड कॉरिडोरवर बुलेट ट्रेन ताशी 300 किलोमीटर वेगाने धावतील तर सेमी हायस्पीड कॉरिडोरवर ताशी 160 किलोमीटरने रेल्वे धावेल.
- एका राज्यातून दुसऱया राज्यात पोहोचण्यासाठी अवघ्या काही तासांचा वेळ लागेल.
- सहा कॉरिडोर निश्चित केले आहेत. एक वर्षांत त्याचा डीपीआर तयार करण्यात येईल. डीपीआरमध्ये या मार्गांच्या व्यवहारतेचा अभ्यास केला जाणार आहे. कॉरिडोरसाठी लागणाऱया जमिनीची उपलब्धता आणि दळणवळण यांचाही अभ्यास केला जाणार आहे. त्यानंतरच हायस्पीड हवे की सेमी हायस्पीड याचा निर्णय घेण्यात येईल, असे यादव यांनी सांगितले.
90 टक्के जमीन अधिग्रहणासाठी आणखी सहा महिने
- मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा पहिल्या प्रकल्पासाठी लागणारी सर्व जमीन अद्याप पूर्णपणे अधिग्रहित झालेली नाही. आगामी सहा महिन्यांत या कॉरिडोरसाठीची 90 टक्के जमिनीचे अधिग्रहण पूर्ण होईल, अशी माहिती यादव यांनी दिली.
- या कॉरिडोरसाठी 1380 हेक्टर जमीन लागणार असून त्यातील 1005 हेक्टर जमीन ही खासगी आहे. यामधील 471 हेक्टर जमिनीचे अधिग्रहण झाले आहे. 149 हेक्टर राज्य सरकारची जमीन आहे तर 128 हेक्टर जमीन रेल्वेची असून ती हायस्पीड कॉर्पोरेशनकडे हस्तांतरित केल्याचे यादव यांनी सांगितले. 2023 मध्ये मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन धावेल, असे ते म्हणाले.
या मार्गांवर धावेल बुलेट ट्रेन
- मुंबई-नाशिक-नागपूर (753 कि. मी.)
- मुंबई-पुणे-हैदराबाद (711 कि. मी.)
- दिल्ली-नोएडा-आग्रा-लखनौ-वाराणसी (865 कि. मी.)
- दिल्ली-जयपूर-उदयपूर-अहमदाबाद (886 कि. मी.)
- दिल्ली-चंदिगड-लुधियाना-जालंदर-अमृतसर (459 कि. मी.)
- चेन्नई-बंगळूरू-म्हैसूर (435 कि. मी.)




























































