इक बंगला बने न्यारा!

1390

>> शिरीष कणेकर

1937 साली ‘प्रेसिडेंट’ सिनेमात कुंदनलाल सैगल गायला होता -,
इक बंगला बने न्यारा
रहे उसमे कुनबा सारा
आज बंगला बांधणे तुमच्या आमच्यासाठी तरी अशक्यप्राय गोष्ट आहे. मी तर ‘टू रूम किचन’ची गोष्ट करण्यापूर्वी जीभ छाटून घेईन. आम्ही आमची स्वप्ने आटोपशीर ठेवायला शिकलोय. अंथरूण पाहून आम्ही पाय पसरतो म्हणजे आखडते घेतो. सुंदर दिसणाऱया नाजूक बायका व टोलेजंग बंगले हे दुसऱयांचे असतात, याची आम्ही मनाशी खूणगाठ बांधल्येय. या बंगल्यात बसायचं व त्या बायका लांबून न्याहाळायच्या हे जास्तीत जास्त आमचं स्वप्न असू शकतं. आम्ही जर त्यांना बघितलंच नाही व तुमच्या टोलेजंग बंगल्यात आम्ही बसलोच नाही तर तुमच्या मालकीच्या या दोन गोष्टींचा उपयोग काय? जसं तुमच्या फर्निचरचं आम्ही कौतुक करावं असं तुम्हाला वाटतं तसंच तुमच्या बायकोच्या आरस्पानी सौंदर्याला आम्ही सभ्यपणे दाद द्यावी अशीच तुमची अपेक्षा असते. आमच्या घरी येऊन आम्हाला एका पायानं लंगडणाऱया खुर्चीवरच बसायचं असतं व बायको नावाचं ध्यान बघायचं असतं. (सासुरवाडीची क्षमा मागून! साडेसातीला ध्यान म्हटल्याबद्दल!)

देव आमच्यावर एवढा रुष्ट का? (दुसऱयाच्या) बंगल्यात जाण्याचे व (दुसऱयाची) सुंदर भार्या बघण्याचे योग आमच्या आयुष्यात अभावानेच येतात. फाइव्ह-स्टार हॉटेलात जेवायला जाण्याचे, फरारी गाडीत बसण्याचे, मॉलमध्ये खरेदी करण्याचे, जग पर्यटन करण्याचे, ‘क्रूझ’वरून सागर सफारी करण्याचे, सुंदरींच्या ताटव्यात विहार करण्याचे, ‘स्कूबा’ डायव्हिंग करण्याचे, लग्नातील करमणुकीच्या कार्यक्रमात गाणी म्हणण्याचे, राजभवनात राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान होण्याचे, माधुरी दीक्षितसवे फुगडी खेळण्याचे, विराट कोहलीच्या घरी अनुष्का भाभीच्या हातचं जेवण जेवण्याचे, राम रहिम बाबाच्या अनुपस्थितीत त्याच्या तळघरातून व भुयारातून मुक्त संचार करण्याचे, अर्णव गोस्वामीबरोबर महाचर्चेत सहभागी होण्याचे, पी. व्ही. सिंधूबरोबर बॅडमिंटन खेळण्याचे, चेंडू पँटवर घासून बुमराहच्या हातात देण्याचे, वाघाच्या पिंजऱयात बसून शब्दकोडे सोडविण्याचे, सापासाठी ठेवलेल्या दुधाच्या बशीतून घोटभर दूध पिण्याचे, साहेबाच्या खुर्चीत बसून त्याच्या सेक्रेटरीवरून हात फिरवण्याचे, तिकीट न काढता फर्स्ट क्लास ए. सी.मधून प्रवास करण्याचे, टुकार चित्रपट बघताना समोरचा पडदा फाडण्याचे असे असंख्य क्षण आमच्या आयुष्यात येणार नाहीत, हे आम्ही चांगलं जाणतो. म्हणूनच कधीकाळी बंगला बांधण्याचं स्वप्नही आम्ही बघू शकत नाहीत. पत्त्यांचा बंगला बांधायला गेलो तर तोही कोसळतो. अनेकदा माझ्या मनात येतं की एखाद्या रिकाम्या बंगल्यात जाऊन रहावं का? पोलीस पकडून नेईपर्यंत मस्तपैकी बंगलेवाला बनून राहायचं त्यानंतर तुरुंगवाला व्हायचं. तिथून सुटल्यावर आहेच आपला वन रूम किचनचा महाल. ‘रहे जिसमे कुनबा सारा’ म्हणजे आपण, बायको आणि चार पोरं!

आपले सिनेमावाले व मालिकावाले सदा आपल्याला थुंक लावीत असतात, आपल्या तोंडाला पानं पुसतात. यांच्या गरीबांची घरंही ऐसपैस असतात. ती एका खोलीत राहत असली तरी दोन बेडरूमचा फ्लॅट आरामात मावेल एवढी ती खोली मोठी असते. असतील ते गरीब पण म्हणून काय त्यांनी काडेपेटीसारख्या घरात राहायचं? स्वतः आलिशान बंगल्यात राहणारा निर्माता गरीब नायकाचं किंवा नायिकेचं जीवनमान स्वतःच्या अधिकारात उंचावतो. खाण्याचे वांधे असलेली अतिगरीब पद्मिनी कोल्हापुरे ‘सौतन’मध्ये भारी भारी साडय़ा नेसते व भल्यामोठय़ा एका खोलीत राहते. ताज्या ‘भागो मोहन प्यारे’ या मालिकेमध्ये तुटपुंजं उत्पन्न असलेलं अतुल परचुरेचं कुटुंब टुमदार बंगलीत राहतं. आसपास नुसती हिरवीगार झाडी. उगीच नाही ‘हडळी’चा अतुलवर जीव जडतो ते. कुठल्या मुलीला (इन धिस केस हडळीला) लग्न करून अशा घरात राहायला आवडणार नाही? ‘दृश्यम’ चित्रपटात चौथी नापास अजय देवगण अशाच एका बंगलीत राहत असतो. गोरगरीबांना परवडणाऱ्या एवढय़ा मोहक बंगल्या कुठं असतात? हमे भी तो बता दो. हम भी गरीब है. हॉटेल मे बटाटेवडे के साथ मुफ्तमे मिलनेवाली चटणी हम माँग माँग के खाते है. म्हणून तर तिथले वेटर्स मला ‘चटनीके’ म्हणून ओळखतात.

आपला बंगला असल्याची स्वप्नेदेखील मला पडत नाहीत. म्हणजेच माझी स्वप्नेही वास्तववादी असतात. उदाहरणार्थ, भोकाचा बनियन मी शर्टात झाकलाय, (त्याच्या आत ‘सिक्स पॅक्स’ दडवलेत.) अशी माझी स्वप्ने असतात. (पोरीनं मला चपलेन मारलंय, अशी स्वप्ने तर मला नेहमीच पडतात. काय सांगू. अनेकदा झोपेतून दचकून उठल्यावर माझा गाल सुजलेला असतो.) मला एक आयडिया सुचल्येय. मालकीची दुचाकी (नॉट नेसेसरीली सायकल) असणारे अनेक जण आपल्या स्कूटरचा उल्लेख ‘गाडी’ असा करतात. ‘गाडी’ पंक्चर झाली, ‘गाडी’ पार्क करायला तुमच्याकडे जागाच नाही. ट्रफिकमध्ये ‘गाडी’ अडकून पडल्यानं उशीर झाला अशी विधान जातायेता करता येतात. याची चारचाकी मोटार असणार असा ऐकणाऱयांचा समज होण्याची शक्यता असते. तेवढंच. याच धर्तीवर मीही आता सांगायला लागणार आहे की, मी बंगला पेंटिंगला काढलाय किंवा मी सगळय़ांना बंगल्यावरच बोलावून घेतलं किंवा आमचे सगळे फंक्शन बंगल्यावरच होतात किंवा बंगल्याची सवय झाल्यावर दुसरीकडे लहान जागेत गुदमरल्यासारखं होतं हो, असं म्हणत रहायचं. माझा बंगला आहे असंच त्यांना वाटणार. प्रत्यक्ष येतील तेव्हाचं तेव्हा बघू…

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या