पाथर्डे येथे आगीत आंबा, काजू बागा जळून खाक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजापूर तालुक्यातील पाथर्डे धांगटवाडी नजीक आंबा, काजू बागांना आकस्मिक आग लागून लाखो रुपयांची हानी झाली आहे. दुपारच्या दरम्यान ही दुर्घटना घडली आहे. माळरानावर असणारे गवत सुकल्यानंतर वणवा लागून आंबा, काजू बागा भक्ष्यस्थानी पडण्याच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे.

राजापूर तालुक्यातील धांगटवाडी नजीक राजापूर केळवडे रस्त्याच्या कडेला वणवा लागल्याची घटना घडली. यामध्ये येथील दत्ताराम धांगट, सुनिल धांगट व दत्ताराम धांगट यांच्या काजू व आंबा बागेला हा वणवा लागला. यामध्ये काजू व आंबा कलमे जळून खाक झाली आहेत. त्यामुळे या तिनही बागांचे मिळून 1 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. या बागेत असलेले व बागेच्या शेजारी असलेले घर सुदैवाने वाचले आहे. तसेच येथील आदर्श शाळा पाथर्डेच्या शिक्षकांनी दोन दिवसांपूर्वी शाळेच्या भेवताली असलेले गवत जाळून टाकले होते. अन्यथा या वणव्यामध्ये शाळेलाही आग लागण्याची शक्यता होती. हा वणवा सुनिल धांगट यांच्या बागेजवळ असलेल्या विद्युत पोलवर झालेल्या शॉर्टसर्किटने लागला असावा, अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू होती .