बस अपघाताला जबाबदार असलेल्या चालकाला 190 वर्षांच्या कारावासाची शिक्षा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य प्रदेशातील पन्ना येथे सहा वर्षांपूर्वी झालेल्या बस अपघातात 22 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता. या अपघाताला जबाबदार असलेला चालक शमसुद्दीन (47) याला येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने दोषी ठरवत तब्बल 190 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच बस मालकाला 10 वर्षांची शिक्षा ठोठावली आहे.

मध्य प्रदेशमधील मांडला येथील राष्ट्रीय महामार्गावर 4 मे 2015 रोजी अनुप ट्रॅव्हल्सची बस दरीत कोसळून लागलेल्या आगीत 19 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता. या प्रकरणावर सहा वर्षे सुनावणी चालली असून न्यायमूर्ती आर. पी. सोनकर यांनी बस चालक आणि मालकाला दोषी ठरवले आहे. त्यानुसार चालक शमसुद्दीनला प्रत्येक मृतामागे 10 वर्षे याप्रमाणे 190 वर्षांची शिक्षा सुनावली आहे, तर मालक ज्ञानेश पांडे याला दहा वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. हे दोघेही सतना जिह्यातील रहिवासी आहेत.

असा झाला होता अपघात

अनुप ट्रॅव्हल्सची बस दुपारी पावणेएकच्या सुमारास छतरपूर येथून निघाली होती. तासाभराच्या प्रवासानंतर बस पन्ना जिह्यातील पांडव फॉल्सजवळील एका पुलावर आली असता चालकाचे नियंत्रण सुटून दरीत कोसळली होती. त्यानंतर बसला आग लागल्याने 19 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता.