पाथर्डीत सराफा व्यावसायिकाला मारहाण; आरोपींविरोधात गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आमच्या दुकानात येणारे गिऱ्हाईक तुझ्याकडे का वळवतो या कारणावरून शहरातील सराफ व्यावसायिक मोदक शहाणे ( मानूरकर) यांना लोखंडी रॉड आणि गजाने बेदम मारहाण करण्यात आली आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या मोदक शहाणे यांना नगरच्या खाजगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. शहाणे यांच्या तक्रारीवरून पोलिसानी या घटनेतील आरोपी व सराफ व्यावसायिक जय बाळासाहेब शहाणे,राज बाळासाहेब शहाणे ,बाळासाहेब भास्कर शहाणे तसेच गोट्या उर्फ राहुल अशोक आव्हाड,विशाल उध्दव आव्हाड (सर्व रा. पाथर्डी) यांच्यासह एका अनोळखी व्यक्तीविरोधात पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेबाबत पोलीसांकडे तक्रार दिली तर खोटा विनयभंगाचा गुन्हा दाखल करीन, अशी धमकी आरोपींनी मोदक शहाणे यांना दिली आहे. या संदर्भात शहाणे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मी रात्री 2.30 वाजण्याच्या सुमारास पाथर्डी शहरात माझ्या चारचाकी गाडीने आलो असता या घटनेतील सर्व आरोपींनी त्यांच्या गाडीने माझ्या गाडीला धडक मारली. त्यामुळे मी खाली उतरलो, तेव्हा सर्व आरोपींनी तुला ठार मारतो, असे म्हणत लोखंडी रॉडने व गजाने मारहाण केली. मारहाणीत मोदक शहाणे यांच्या हाताला जबर मार लागुन फँक्चर झाले आहे. या वेळी कानिफ कराळे, गणेश चन्नेकर आयुश मालवुनकर हे भांडण सोडविण्याकरिता आले असता, त्यांनाही मारहाण करण्यात आली. आरोपींनी आपल्या गळ्यातील चार तोळे वजनाची सोन्याची चैन व वीस हजार रुपये पळवून नेल्याचे तक्रारीत म्हटले आहे.