
क्रिप्टो ट्रेडिंगच्या नावाखाली ठगाने व्यावसायिकाची 1 कोटी 26 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पूर्व प्रादेशिक सायबर पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.
तक्रारदार हे व्यावसायिक आहेत. त्यांची एक खासगी कंपनी आहे. गेल्या दोन वर्षांपासून ते क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करत आहेत. फेब्रुवारी महिन्यात ते घरी असताना त्यांना एका नंबरवरून फोन आला. फोन करणाऱयाने त्याचे नाव सांगून फॉरेक्स ट्रेडिंग आणि क्रिप्टो करन्सीबाबत माहिती दिली. क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळेल असे त्यांना भासवण्यात आले. त्यानंतर त्यांना एक अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. ते अॅप त्यांनी डाऊनलोड केले. तसेच ठगाने तक्रारदार यांच्या नावाचा एक व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला. तसेच वेगवेगळय़ा खात्यात पैसे भरण्यास सांगून त्याचे स्क्रीनशॉट त्या ग्रुपवर टाकण्यास सांगितले.
गुंतवणूक केलेली ती रक्कम त्या अॅपवर दिसत होती. त्यामुळे तक्रारदार यांना विश्वास निर्माण झाला. विश्वास ठेवून त्यांनी 1 कोटी 26 लाख रुपयांची गुंतवणूक केली. गुंतवणूक केलेली ती रक्कम काढण्याचा त्याने प्रयत्न केला, मात्र ती रक्कम निघत नव्हती. त्या रकमेबाबत विचारणा केली असता एक जण त्यांना टाळाटाळ करू लागला. त्यानंतर डिसेंबर महिन्यात ते अॅप बंद झाले. अॅप बंद झाल्यावर तक्रारदार यांनी पुन्हा एकाला संपर्क केला. त्याने काहीच प्रतिसाद दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पूर्व प्रादेशिक सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.





























































