CAA विरोधी आंदोलनाचा कार आणि घड्याळ विक्रीला फटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला देशभरातून मोठ्या प्रमाणात विरोध झाला. अनेक ठिकाणी कायद्याविरोधात निदर्शने झाली. तर काही ठिकाणी या निदर्शनांना हिंसक वळणही लागले. त्याचा मोठा फटका कार विक्री आणि घड्याळ विक्रीलाही झाला आहे. यापूर्वी त्याचा फटका पर्यटन व्यवसायालाही लागला होता.

नागरिकत्व कायद्याला विरोध म्हणून देशभरात ठिकठिकाणी निदर्शने झाली. निदर्शनाला हिंसक वळण लागल्याने देशाच्या ऑटोमोबाईल इंडस्ट्री, हॉटेल व्यवसाय आणि पर्यटन व्यवसायायसह घड्याळ विक्रीला फटका बसला आहे. हिंसक निदर्शने झाल्याने अनेक ठिकाणी जमावबंदी लागू करण्यात आली होती. त्यामुळे अनेक ग्राहक कार शोरूम आणि घड्याळ्च्या शोरूमध्ये गेलेच नाही.

टायटन ही घड्याळ बनवण्याची सुप्रसिद्ध संस्था आहे. डिसेंबर 2019 मध्ये मोठ्या प्रमाणात ग्राहक कमी झाल्याचे कंपनीच्या अधिकार्‍यांनी सांगितले. दिल्ली आणि इशान्येकडील राज्यात हिंसक आंदोलन झाल्याने त्याचा हा परिणाम असल्याचे त्यांनी सांगितले. जानेवारीतही ही संख्या रोडावलेलीच आहे.

दिल्ली लखनऊ कोलकाता भागात या निदर्शनांचा हॉटेल व्यवसायिकांनाही फटका बसला आहे. अनेक ठिकाणी सुरक्षेचा उपाय म्हणून जमावबंदी लागू करण्यात आली होती. त्यामुळे ग्राहक हॉटेलमध्ये न आल्याने हॉटेल चालकांना आर्थिक फटका बसला आहे.

कारच्या शोरूममध्येही याकाळात शुकशुकाट पहायला मिळाला. हिंसक आंदोलन आणि जमावबंदीमुळे ग्राहकांचे पाय कारच्या शोरुमला लागलेच नाही.

डिसेंबरमध्येच पर्यटन व्यववसायाला मोठा फटका बसला होता. अनेक पर्यटकांनी ऐनवेळी बुकिंग रद्द केली. तसेच पर्यटकांचे सर्वाधिक आवडते स्थळ ताज महाललाही पर्यटकांची संख्या कमी झाली होती. तीन तीन महिन्यांपूर्वी पर्यटकांनी गाडी आणि हॉटेलचे केलेले बुकिंग ऐनवेळी रद्द केले. तसेच रशिया, अमेरिका, इंग्लंड, इस्राएलच्या दुतावासांनी त्यांच्या नागरिकांसाठी सूचना जारी केली होती. निदर्शनाच्या ठिकाणी तसेच इशान्येकडील राज्यात जाताना काळजी घ्यावी असेही दुतावासांनी आपल्या नागरिकांना सांगितले होते.