राष्ट्रभक्तीला जाती-धर्माचे लेबल लावू नका!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशाच्या स्वातंत्र्यलढय़ात हिंदूंसह सर्वधर्मीयांनी आपल्या प्राणांची बाजी लावली. स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले. त्यामुळे राष्ट्रभक्तीला जाती-धर्माची लेबल लावू नका, असे परखड मत शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी शनिवारी व्यक्त केले. जाचक आणि अन्यायकारक ‘नागरिकत्व’ कायद्याविरोधात शिवसेना सर्वधर्मीयांच्या पाठीशी ठाम असल्याचेही ते म्हणाले.

केंद्र सरकारने सुधारित नागरिकत्व कायदा मंजूर केल्यानंतर संपूर्ण देशात आंदोलनाचा भडका उडाला आहे. या पार्श्वभूमीवर ‘जमात-ए-इस्लामी हिंद, मुंबई’च्या वतीने मुंबई मराठी पत्रकार संघात वार्तालापचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सुधारित नागरिकत्व कायद्याच्या धोक्याबाबत संजय राऊत यांनी शिवसेनेची भूमिका मांडली. या कायद्याचा फटका केवळ मुस्लीम धर्मीयांनाच बसणार नसून 30 कोटी हिंदूंनाही बसणार आहे. केंद्राने बहुमताच्या जोरावर कायदा मंजूर केला असला तरी कुणीही घाबरून मागे हटण्याचे कारण नसल्याचे ते म्हणाले. अन्यायाविरोधात उभं राहून टक्कर देण्याचा इतिहास महाराष्ट्राने देशाला दाखवून दिला आहे. नुकत्याच स्थापन झालेल्या महाराष्ट्रातील महाआघाडीच्या ‘सरकार’वरून ही बाब पुन्हा एकदा अधोरेखीत झाली आहे. ‘सबका साथ, सबका विकास’ आम्हीही करू शकतो हे आम्ही दाखवून दिले. झारखंडमध्येही हे दिसले. त्यामुळे या कायद्याचा फटका बसणाऱया कुणीही घाबरू नये, शिवसेना तुमच्या पाठीशी ठाम आहे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वतीने सांगत असल्याचे ते या वेळी म्हणाले. या वेळी माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे-पाटील, असीफ भाटकर, ऍड. मिहीर देसाई, मेहमूद दरियाबादी यांनीदेखील नागरिकत्व कायद्याच्या धोकादायक परिणामांची माहिती देत अन्यायाविरोधात सर्वधर्मीयांनी आवाज उठवण्याची गरज असल्याचे सांगितले.

शिवसेनेचे हिंदुत्व संकुचित नाही

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी देशहितासाठी प्रखर हिंदुत्वाची भूमिका मांडली. देश सर्वांचा आहे असे ते म्हणत. मात्र देशाच्या विरोधात कृत्य करणाऱयांचा त्यांनी नेहमीच समाचार घेतला. सर्व धर्मात बाळासाहेबांचे जीवलग मित्र होते. त्यामुळे शिवसेनेचे हिंदुत्व संकुचित नव्हते, अशी कणखर भूमिकाही संजय राऊत यांनी मांडली.

घाबरू नका, अन्यायाविरोधात उभे रहा!

देशाच्या इतिहासात झालेल्या आंदोलनांत विद्यार्थ्यांचा पुढाकार राहिला आहे. मात्र सध्याचे केंद्र सरकार आंदोलक विद्यार्थ्यांवर गोळीबार करीत असेल तर देश आणि देशाची लोकशाही धोक्यात असल्याचे प्रतिपादनही संजय राऊत यांनी केले. त्यामुळे घाबरू नका, अन्यायाविरोधात उभे रहा, असे आवाहनही त्यांनी केले. कायद्याविरोधात एक इंच मागे जाणार नाही, अशी भाषा करणाऱया सरकारला आपण सर्वांनी मिळून मागे ढकलून देऊ, असे सांगतानाच केवळ मुस्लीम नाही तर सर्वधर्मीयांनी एकत्र येऊन सरकारच्या अन्यायकारक भूमिकेला विरोध केला पाहिजे, असे आवाहनही राऊत यांनी केले.