
लोणार सरोवराचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्यासाठी 369 कोटी 78 लाख रुपयांच्या विकास आराखडय़ास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. नियोजन विभागाने मंजूर आराखडय़ातील कामनिहाय आवश्यक निधी लोणार सरोवर विकास समितीकरिता पीएलए खाते तयार करून त्यात वर्ग करण्यात येईल.
यासंदर्भात उच्च न्यायालयाने आदेश दिले होते. या कामांची विभागीय आयुक्त, अमरावती यांच्या अध्यक्षतेखाली अंमलबजावणी केली जाईल. यात लोणार सरोवर परिसरात मंदिराचे जतन, निसर्ग पर्यटन, वन्यजीव संरक्षण, सरोवराभोवती पदपथ, रस्त्यांचे भूसंपादन, अतिक्रमण धारकांचे पुनर्वसन अशी विविध कामे केली जातील.
वीज ग्राहकांसाठी प्रिपेड/स्मार्ट मीटर बसविणार
राज्यातील विद्युत वितरण प्रणालीत मोठय़ा प्रमाणावर सुधारणा करून वितरण कंपन्या आर्थिकदृष्टय़ा सक्षम करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. तसेच शेतकऱयांना वीज दरात सवलत देण्यास मान्यता देण्यात आली. यानुसार उपसा जलसिंचन योजनेतील शेतकऱयांना जून 2021पासून 1 रुपया 16 पैसे प्रतियुनिट व स्थिर आकारामध्ये 25 रुपये प्रतिकेव्हीए इतकी सवलत कायम ठेवण्यात येईल.
शेतकऱयांना प्रोत्साहनपर लाभ योजना
राज्यातील शेतकऱयांना 50 हजार रुपयांच्या मर्यादेत प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णयास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. महाविकास आघाडी सरकारकडूनही याबाबत निर्णय घेण्यात आला होता. आता त्याची नव्याने अंमलबजावणी होणार आहे. सुमारे 14 लाख शेतकऱयांना याचा लाभ मिळेल आणि 6 हजार कोटी रुपये निधी लागेल. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सुमारे 13.85 लाख शेतकऱयांच्या 14.57 लाख कर्जखात्यांसाठी अंदाजे रु. 5722 कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे.
राजकीय, सामाजिक आंदोलनातील खटले मागे घेण्यास मान्यता
राज्यात राजकीय व सामाजिक आंदोलनातील ज्या गुह्यांमध्ये मार्च 2022पर्यंत दोषारोपपत्र दाखल झाले आहेत, असे खटले मागे घेण्याची कार्यवाही करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. त्याचप्रमाणे कोरोना काळात विद्यार्थी व सुशिक्षित बेरोजगारांवर खटले दाखल झाल्यामुळे त्यांना नोकरीच्या ठिकाणी किंवा पासपोर्ट व चारित्र्य पडताळणीच्या वेळेस अडचणी येतात, ते दूर करण्यासाठी समितीकडून कार्यवाही करण्यास मान्यता देण्यात आली.
हिंगोलीत बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्र
महाविकास आघाडीने घेतलेल्या निर्णयाची पुनरावृत्ती करण्यात आली. राज्यासाठी हळद संशोधन व प्रक्रिया धोरण लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच हिंगोली जिह्यात बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्र स्थापन्यास मान्यता देण्यात आली. हिंगोली जिह्यात बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्र कंपनी कायद्यानुसार ना-नफा तत्त्वावर एक स्वायत्त संस्था म्हणून स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली.
उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने दिलेल्या निर्णयानुसार धुळे जिह्यातील साक्री येथील संत तुकाराम सामाजिक संस्था, धाराशीव जिह्यातील अश्वमेध बहुउद्देशीय शैक्षणिक व सामाजिक संस्था, जालना येथील दिशा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था या तीन संस्थांना कायम स्वरुपी विनाअनुदान तत्त्वावर मान्यता आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली.



























































