नक्षलग्रस्त भागात कार्यकर्त्यांकडून गुपचूप प्रचार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । गडचिरोली

नक्षलवाद्यांचा गढ असलेल्या गडचिरोलीत उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते जाहीरपणे पोस्टर्स, बॅनर्स अथवा लाऊडस्पीकर्स लावून प्रचार करीत नाहीत. एकीकडे नक्षलवाद्यांची भीती आणि दुसरीकडे पोलिसांचा ससेमिरा यामुळे कार्यकर्ते आपल्या पक्षाचा अथवा उमेदवाराचा जाहीर प्रचार करायला घाबरतात. या भागातील दहशतीमुळे बाहेरची व्यक्ती इथे फिरकतही नाही.

गडचिरोलीतील भामरागड, एटापल्ली, अहेरी, सिरोंचा आणि धानोरा या नक्षलग्रस्त भागांचा समावेश होतो. एटापल्लीतील स्थानिकांशी संवाद साधला असता एकीकडे नक्षलवाद्यांची भीती आणि दुसरीकडे पोलीस अशा कात्रीत ते सापडल्याचे जाणवते. भामरागड, एटापल्ली येथील दुर्गम नक्षलग्रस्त भागात कसा प्रचार केला जातो अशी विचारणा केली असता एका तरुणाने उलगडा केला. तो सांगतो, नक्षलग्रस्त भागातील दुर्गम भागांमध्ये गाडीवर लाऊडस्पीकर किंवा पक्षाचा झेंडा लावून प्रचार केला जात नाही. स्थानिक कार्यकर्तेच ग्रामस्थांमध्ये अत्यंत सावधपणे प्रचार करतात, तर काँग्रेसमध्ये सक्रिय असलेल्या एका व्यक्तीला विचारले असता तो म्हणतो, नक्षलग्रस्त भागातील दुर्गम खेडय़ांमध्ये बाहेरील कार्यकर्ते किंवा नेते जात नाहीत.  या भागात अजूनही कोणताच उमेदवार गेलेला नाही. पक्षाचे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते यांच्यावरच प्रचाराची धुरा आहे.

दुर्गम भागात मतदानाच्या एक दिवस अगोदर स्थानिकांच्या बैठका

सिंरोचा येथे परिस्थिती आणखी वेगळी आहे. येथील दुर्गम भागात उमेदवार कोण हेदेखील माहीत नसते. या भागातील मंडळी मतदानाच्या एक- दोन दिवस अगोदर गावात बैठक घेऊन मतदान कोणाला करायचे याचा निर्णय घेतात. नेते येतात आणि जातात. पण शेवटी गावातील लोकांना तिथेच राहायचे आहे. म्हणून स्थानिक कार्यकर्ते प्रचार करताना सावध असतात, असे एका ग्रामस्थाने सांगितले.