
सामना प्रतिनिधी । रत्नागिरी
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा आज सायंकाळी पाच नंतर थंडावल्या. या मतदारसंघात 12 उमेदवार रिंगणात असून महायुतीचे उमेदवार विनायक राऊत यांनी प्रचारात आघाडी घेतली होती.दिनांक २३ एप्रिल रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत 1942 मतदान केंद्रावर 14 लाख 54 हजार मतदार आपला हक्क बजावणार आहेत.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार खासदार विनायक राऊत, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे डॉ. निलेश राणे यांनी अर्ज भरले आहेत. काँग्रेस आघाडीच्यावतीने नविनचंद्र बांदिवडेकर, वंचित बहुजन आघाडीतर्फे मारुती जोशी, बहुजन रिपब्लिक सोशालिस्ट पार्टीतर्फे राजेश दिलीप जाधव, बहुजन समाज पार्टीतर्फे किशोर वरक, समाजवादी फ़ॉरवर्ड ब्लॉक पक्षाचे उमेदवार संजय गांगनाईक, अपक्ष विनायक लवू राहत, पंढरीनाथ आंबेरकर, बहुजन मुक्ता पार्टीचे भीकूराम पालकर, अपक्ष नारायण गवस,नीलेश भातडे रिंगणात आहेत.
जागते रहो रात्र वैऱ्याची
थेट प्रचाराची रणधुमाळी आज सायंकाळी पाच वाजता संपली. प्रचार आरोप-प्रत्यारोपने रंगला. शिवसेना आणि नीलेश राणे यांच्यातील संघर्षामुळे निवडणूक लक्षवेधी ठरली. आज रात्रीपासून छुपा प्रचार आणि फोडाफोडीचे राजकारण सुरू होणार असल्याने सर्वच उमेदवार आणि पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांना उद्याची रात्र जागते रहो असा सल्ला देत आहेत



























































