
सामना ऑनलाईन । मुंबई
राज्यातल्या 17 लोकसभा मतदारसंघांत सोमवार, 29 एप्रिल रोजी होणाऱ्या निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आज सायंकाळी थंडावल्या. शेवटच्या दिवशी शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीच्या उमेदवारांनी भव्यदिव्य रोड शो, पदयात्रांचा जबरदस्त धडाका उडवून दिला. शुक्रवारी बीकेसी मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची झालेली जबरदस्त प्रचारसभा आणि रोड शोच्या धडाक्यामुळे महायुतीच्या विजयावर शिक्कामोर्तबच झाले आहे.
महाराष्ट्रात तीन टप्प्यांत लोकसभा निवडणूक झाल्यावर आता चौथ्या व अंतिम टप्प्यातील निवडणुकीचे मतदान होत आहे. सोमवार, 29 एप्रिल रोजी नंदुरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई उत्तर-मध्य, मुंबई दक्षिण-मध्य, मुंबई दक्षिण, मावळ, शिरूर आणि शिर्डी या लोकसभा मतदारसंघांत मतदान होईल.
महायुतीचा तडाखेबंद प्रचार
चौथ्या टप्प्यांतील निवडणूक प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी जबरदस्त तडाखेबंद प्रचार सभा घेतल्या. आदित्य ठाकरे यांच्या ‘आदित्य संवाद’ला युवा पिढीचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला. शिवसेना-भाजप महायुतीच्या नेत्यांनी तडाखेबंद प्रचार केला. शुक्रवारी बीकेसी मैदानावर महायुतीच्या अति अति अतिविराट सभेचा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाआघाडीने धसका घेतला आहे.
राहुल गांधींना धसका
एकीकडे महायुतीचे सर्व नेते एकदिलाने मुंबई प्रचार करीत होते, तर दुसरीकडे महाआघाडीच्या नेत्यांमध्ये विसंवाद होता. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी तर मुंबईत फिरकलेच नाहीत. गुरुवारी मुंबईत रोड शो होणारा त्यांचा रोड शोही रद्द झाला.
मिलिंद देवरा जबरदस्तीने रिंगणात
दक्षिण मुंबईतून काँग्रेसचे मिलिंद देवरा यांनी प्रारंभी निवडणूक लढवण्यास नकार दिला होता. मुंबई काँग्रेसमधील मतभेदांचा मिलिंद देवरा यांनी धसका घेतला होता. पण काँग्रेस पक्षश्रेष्ठाRनी आदेश दिल्यामुळे मिलिंद देवरा यांना निवडणूक लढवण्याशिवाय पर्याय उरला नाही.
एकनाथ गायकवाड यांना विरोध
दक्षिण-मध्य मुंबईत महाआघाडीचे उमेदवार एकनाथ गायकवाड यांनाही सुरुवातीपासून काँग्रेसमधील एका गटाचा विरोध होता. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते मनापासून प्रचारात सहभागी झाले नाहीत.
निरुपम यांच्या पायाखालची जमीन सरकली
उत्तर-पश्चिम मुंबईतील काँग्रेसचे उमेदवार संजय निरुपमही निवडणूक लढवण्याच्या मानसिकतेत नव्हते. आता तर यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे.
प्रिया दत्त़ही तयार नव्हत्या
उत्तर-मध्य मुंबईतून काँग्रेसच्या प्रिया दत्तही सुरुवातीला निवडणूक लढवण्याच्या मानसिकतेमध्ये नव्हत्या, पण अखेर काँग्रेसच्या आग्रहामुळे त्या रिंगणात उतरल्या आहेत.
मराठी मतदार कोटक यांच्या मागे
उत्तर-पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघातील महाआघाडीचे संजय पाटील यांनी महायुतीच्या प्रचाराचा धसका घेतला आहे. या मतदारसंघातील मराठी मतदारही मनोज कोटक यांच्या पाठीशी उभे राहिल्यामुळे संजय पाटील यांना पराभवाच्या भीतीने पछाडले आहे.
चित्रपट अभिनेत्री खासदार नको
उत्तर मुंबईत महाआघाडीच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर चित्रपट अभिनेत्री असल्याने त्यांना जवळून बघण्यासाठी मतदार गर्दी करीत आहेत. पण चित्रपट अभिनेते निवडून आल्यावर मतदारसंघात फिरकतही नाहीत असा मतदारांचा अनुभव असल्याने मातोंडकर यांना मतदान करण्याच्या मानसिकतेमध्ये मतदार नाहीत. त्यामुळे गोपाळ शेट्टी यांच्या पारडय़ात मते टाकण्याचा मतदारांनी निर्धार केला आहे.





























































