
कॅनडाच्या गुप्तचर सुरक्षा युनिटने हिंदुस्थानवर पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. कॅनडाच्या निवडणुकीमध्ये हिंदुस्थान सरकारने सक्रियपणे हस्तक्षेप केला आहे. गुप्तचर रिपोर्टमधून हा दावा करण्यात आला आहे. या आरोपामुळे हिंदुस्थान-कॅनडा या दोन्ही देशांतील संबंध पुन्हा एकदा चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन टडो यांनी या आरोपांची आणि अहवालातील मुद्दय़ांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
कॅनडामधील ‘परराष्ट्र हस्तक्षेप धोका’ नावाच्या रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आला आहे. कॅनडियन गुप्तचर एजेन्सीचा 24 फेब्रुवारी 2023 चा हा रिपोर्ट आहे. या अहवालात म्हटले की, परकीय हस्तक्षेपामुळे कॅनडातील लोकशाही धोक्यात येत आहे. असे परकीय हस्तक्षेप हळूहळू आपली लोकशाही कमकुवत करू लागले आहेत. आपला बहुसांस्कृतिक समाज मोठय़ा कष्टाने उभा राहिला आहे आणि एकत्र आला आहे. परंतु, आपल्या एकात्मतेला धक्का पोहोचवणे, कॅनेडियन लोकांच्या हक्कांची गळचेपी करणे, येथील नियमांचे उल्लंघन करण्याचे प्रकार समोर येत आहेत.
त्यामुळे कॅनडियन सरकारने यापुढे अधिक तत्परतेने देशाची मजबूत लोकशाही व्यवस्था आणि प्रक्रिया यांचे संरक्षण करायला हवे. जर लवकरच ती पावले उचलली नाहीत तर हिंदुस्थान कॅनडामध्ये अधिक सक्षमपणे हस्तक्षेप करू लागेल. कॅनडाने पहिल्यांदाच हिंदुस्थानवर निवडणुकीमध्ये हस्तक्षेप केल्याचा आरोप केला आहे. कॅनडाने याआधी चीन आणि रशियाने राजकारणात हस्तक्षेप केल्याचा आरोप केला आहे. या रिपोर्टमध्ये चीनपासून सर्वाधिक धोका असल्याचे म्हटले आहे. रिपोर्टमध्ये हिंदुस्थान आणि चीन यांचा स्पष्टपणे उल्लेख करण्यात आला आहे. खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जर याची हत्या हिंदुस्थानी गुप्तचर यंत्रणेने केली असल्याचा दावा कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन टडो यांनी केला होता. परंतु, हिंदुस्थानने हे आरोप फेटाळून लावले होते.




























































