
कॅनडाच्या सस्केचेवान भागात दोन समुदायात झालेल्या चाकू हल्ल्यात 10जणांचा मृत्यू झाला असून 15 जण जखमी झाले आहेत. या चाकू हल्लाप्रकरणी दोन संशयितांचा शोध सुरू आहे. कॅनडात सुमारे 13 ठिकाणी चाकू हल्ल्याच्या घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. हा हल्ला कोणी आणि का केला, याची माहिती मिळालेली नाही.
या हल्ल्यानंतर पोलिसांनी दोन संशयित हल्लेखोरांचे फोटो जारी केले आहेत. डेमियन सँडरसन (31) आणि माइल्स सँडरसन (30) अशी त्यांची नावं आहेत. ते दोघे संशयित काळ्या रंगाच्या निसान गाडीतून आले होते आणि हल्ला करून पसार झाल्याची माहिती मिळाली आहे. या हल्ल्यात काही जणांना लक्ष्य करण्यात आले आहे. तर काहीजणांवर विनाकारण हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामागचे कारण अद्याप समजलेले नाही, असे सस्केचेवान रॉयल कनाडियन माऊंटेड पोलीस विभागाचे अधिकारी रोंडा ब्लॅकमोर यांनी सांगितले. तसेच या हल्ल्यातील मृतांची आणि जखमींची संख्या वाढण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे.
स्थानिक वेळेनुसार पहिला हल्ला सकाळी 8.20 मिनिटांनी झाला. त्यानंतर सर्व प्रांतात सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. संशयित हल्लेखोर प्रांतातच असल्याने पोलिसांनी नागरिकांना सर्तकता बाळगण्याचे आवाहन केले आहे. तसेच महत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नये. योग्य आणि सुरक्षित ठिकाणीच थांबावे. तसेच अनोळखी व्यक्तींना लिफ्ट देऊ नये, अशा सूचना केल्या आहेत. परिसरात संशयित व्यक्ती आढळल्यास तातडीने त्याची माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी हल्ल्यानंतर शोक व्यक्त केला असून, हे फारच भयानक आणि मन हेलावून टाकणारं असल्याचं म्हटलं आहे.




























































