
लातूर जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघामध्ये बंडखोरी करण्यात आली होती. सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी प्रमुख बंडखोरांना शांत करण्यात युतीला यश मिळाले आहे. लातूर जिल्ह्यातील अहमदपूर विधानसभा मतदारसंघात भाजपाचे दिलीपराव देशमुख अपक्ष निवडणूक लढवत आहेत. तर औसा विधानसभा मतदारसंघात भाजपाचे जिल्हापरिषद सभापती बजरंग जाधव हे निवडणूक रिंगणात उतरले आहेत. उदगीर विधानसभा मतदारसंघातून आमदार सुधाकर भालेराव, लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे रमेश कराड आणि औसा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनचे माजी आमदार दिनकर माने यांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे.
लातूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघापैकी केवळ लातूर शहर आणि निलंगा विधानसभा मतदारसंघामध्ये बंडखोरी झाली नव्हती. अहमदपूर विधानसभा मतदारसंघात भाजपाच्या पंचायत समितीच्या सभापती अयोध्या केंद्रे यांनी पदाचा राजीनामा देऊन वंचित विकास आघाडीत प्रवेश केला व उमेदवारी मिळवली. विद्यमान आमदार विनायक पाटील यांना भाजपाने उमेदवारी दिल्याने नाराज झालेल्या दिलीप देशमुख यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. त्यामुळे या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे बाबासाहेब पाटील, शिवसेना भाजपा युतीचे आमदार विनायक पाटील, वंचित विकास आघाडीच्या अयोध्या केंद्रे आणि अपक्ष दिलीप देशमुख अशी लढत होणार आहे.
औसा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे दिनकर माने यांनी भूमीपूत्रांना हाक देत उमेदवारी अर्ज शक्तीप्रदर्शन करत भरला होता. परंतु मातोश्रीचा आदेश आल्यानंतर त्यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. भाजपाच्या माजी नगराध्यक्ष किरण उटगे यांनीही उमेदवारी मागे घेतली. या विधानसभा मतदारसंघात आता 14 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून प्रमुख लढत शिवसेना भाजपायुतीचे मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार आणि काँग्रेस आघाडीचे बस्वराज पाटील मुरुमकर यांच्यात होणार आहे.
लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात भाजपाच्या रमेश कराड यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. त्यांनीही आपला उमदेवारी अर्ज मागे घेतल्यामुळे या मतदारसंघात आता शिवसेना भाजपायुतीचे सचिन देशमुख आणि काँग्रेस आघाडीचे धीरज देशमुख असा सरळ सामना रंगणार आहे. लातूर शहर विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेना भाजपा युतीचे शैलेश लाहोटी, काँग्रेस आघाडीचे आमदार अमित देशमुख, वंचित विकास आघाडीचे राजा मणियार अशी तिरंगी लढत पाहण्यास मिळणार आहे. उदगीर विधानसभा मतदारसंघातून विद्यमान भाजपा आमदार सुधाकर भालेराव यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे या मतदारसंघात शिवसेना भाजपा युतीने डॉ. अनिल कांबळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे संजय बनसोडे यांच्यात लढत होणार आहे.

































































