
मुंबई पोलीस शिपाई चालक भरती प्रक्रियेतील 1600 मीटर धावणे चाचणीमध्ये जास्त गुण मिळविण्यासाठी शक्कल लढविणे आठ उमेदवारांना चांगलेच भारी पडले आहे. भरती प्रक्रियेत नोंदणी करतेवेळी बांधण्यात आलेली चीप आपापसात बदली करून जादा गुण मिळविण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. याप्रकरणी त्या आठही जणांविरोधात पवई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शरद बुधवंत, संतोष केदार, आदिनाथ जाधव, महेश आव्हाड, दीपक शिरसाट, अनिल आव्हाड, ऋषिकेश बुधवंत आणि मदन आव्हाड अशी त्या आठ उमेदवारांची नावे आहेत. हे सर्व उमेदवार पोलीस शिपाई चालक भरती प्रक्रियेत सहभागी झाले होते. ते मरोळ पोलीस मैदानात मैदानी चाचणी परीक्षेला हजर राहिले होते. 1600 मीटर धावणे चाचणीमध्ये जास्त गुण मिळविण्यासाठी या आठ जणांनी त्यांना नोंदणी करतेवेळी दिलेली चीप आपापसात संगनमताने बदली केली होती. हा प्रकार समोर येताच त्या आठ जणांविरोधात पवई पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




























































