
महानगरपालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल करता येतील, असे राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्पष्ट केले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची आज राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पार पडली. यावेळी नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये उमेदवार व राजकीय पक्षांची मागणी लक्षात घेऊन नामनिर्देशनपत्रे ऑनलाइनबरोबरच ऑफलाइन पद्धतीनेदेखील दाखल करण्याची मुभा देण्यात आली होती. त्याप्रमाणे महानगरपालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी उमेदवारांना पारंपरिकरीत्या ऑफलाइन पद्धतीने नामनिर्देशनपत्रे दाखल करता येणार असल्याचे दिनेश वाघमारे यांनी स्पष्ट केले.
मुंबईत दुबार मतदारांच्या शोधासाठी ऑप्लिकेशन
मुंबई महानगरपालिकेने संभाव्य दुबार मतदारांचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र संगणक प्रणाली (ऑप्लिकेशन) विकसित केली आहे. त्याद्वारे आणि घरोघरी जाऊन संभाव्य दुबार मतदारांचा शोध घेण्याची दक्षता घेण्यात येत असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त वाघमारे यांनी दिली.
मताधिकार मोबाईल ऍप
मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने medahedaescvoterliedst.in हे संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच ‘मताधिकार’ हे मोबाईल ऍपदेखील विकसित केले आहे. ते गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असल्याची माहिती वाघमारे यांनी दिली.

























































