
पंजाब काँग्रेसमध्ये नाराजीचे चक्रीवादळ घोंघावत असतानाच माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मंगळवारी काँग्रेस पक्षश्रेष्ठाRना आणखी एक धक्का दिला. सायंकाळी त्यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री, भाजप नेते अमित शहा यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. दोघांमध्ये बंद दाराआड जवळपास 45 मिनिटे चर्चा चालली. ही सदिच्छा भेट असल्याचे सांगण्यात आले. याचवेळी अमरिंदर यांना भाजपकडून केंद्रीय कृषिमंत्रीपदाची ऑफर दिली जाण्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
कॅप्टन अमरिंदर यांनी पंजाब मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांची पुढील भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याचदरम्यान ते मंगळवारी सायंकाळी अमित शहांना भेटल्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आले आहे. ‘ही सदिच्छा भेट’ असल्याचे सांगून दोघांच्या बैठकीतील तपशील गुप्त ठेवण्यात आला आहे. दुसरीकडे, गुरुवारी काँग्रेसचा मोठा नेता भाजपमध्ये दाखल होणार असल्याची चर्चा सुरू आहे. हा मोठा नेता कॅप्टन अमरिंदरच असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अमरिंदर मंगळवारी दिल्लीत पोहोचले, त्यावेळी त्यांनी आपण कोणत्याही राजकीय व्यक्तीला भेटणार नसल्याचे सांगितले होते. परंतु बुधवारी त्यांनी अमित शहांना भेटून काँग्रेस पक्षश्रेष्ठाRसह सर्वांनाच मोठा धक्का दिला. भाजप त्यांना राज्यसभेच्या माध्यमातून सरकारमध्ये आणेल आणि केंद्रीय कृषिमंत्री बनवेल, अशी चर्चा रंगू लागली आहे.
शेतकऱयांना शांत करण्याची खेळी
अमरिंदर यांनी भाजप प्रवेशासंबंधी प्रश्नांना उत्तर देण्यास नकार दिला. परंतु त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देताना आपल्यापुढे सर्व पर्याय खुले असल्याचे सांगितले होते. त्यामुळे त्यांचे पक्षांतर अटळ मानले जात आहे. अमरिंदर यांनी शेतकरी आंदोलनाला सुरुवातीपासून पाठिंबा दिला आहे. शेतकऱयांमध्ये त्यांच्याविषयी चांगले मत आहे. त्यामुळे शेतकऱयांना त्यांच्यामार्फत चुचकारण्यासाठी भाजप नवी खेळी खेळत असल्याचे बोलले जात आहे.





























































