टायर फुटल्याने कार शेतातील विहिरीत पडली; गाडीतील डॉक्टरचा गुदमरून मृत्यू

होंडा कंपनीच्या कारचे टायर फुटल्याने चालकाचा ताबा सुटला आणि ही कार रस्त्याच्या कडेला असलेल्या एका विहिरीत जाऊन कोसळली. विहिरीमध्ये काठोकाठ पाणी भरलेले असल्याने ही कार विहिरीत बुडाली. यात कारमध्ये अडकलेल्या डॉक्टरचा मृत्यू झाला. डॉ. सय्यद मुजम्मील असे मृत डॉक्टरांचे नाव आहे.

डॉ. सय्यद मुजम्मील हे स्वतः ही कार चालवत होते. या संदर्भात प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, गाडी भरधाव वेगाने परभणीकडे येत असताना गाडीचे टायर फुटले. यानंतर चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. यामुळे ही गाडी रस्त्याच्या बाजुला शेताच्या बांधावर असलेल्या 30 फूट खोल विहिरीत गाडी कोसळली. नंतर नागरिकांनी ही कार ट्रॅक्टरच्या साहाय्याने काढण्याचा प्रयत्न केला. मात्र ते शक्य न झाल्याने अखेर क्रेनच्या साहाय्याने गाडी बाहेर काढण्यात आली.

डॉ. सय्यद मुजमिल यांचा मृतदेहही बाहेर काढण्यात आला. त्यांचे मेहुणे घटनास्थळी आल्यानंतर ओळख पटली. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालय येथे पाठवण्यात आला आहे.

‘पत्नीला घेण्यासाठी परभणीकडे येत होते’

डॉ.सय्यद मुजम्मील हे संभाजीनगर येथे वास्तव्यास होते. ते माहेरी आलेल्या पत्नीला नेण्यासाठी परभणीत येत होते. मात्र, वाटेतच त्यांचा अपघात झाला.

आपली प्रतिक्रिया द्या