
सामना प्रतिनिधी । अलिबाग
तालुक्यातील चरी येथे सोमवारी दुपारी धावत्या कारने अचानक पेट घेतला. गाडीच्या चालकाने वेळीच सावधानता बाळगल्याने जीवितहानी टळली. चरी येथे राहणारे संतोष मोहिरे दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास आपली ओमनी कार चालवत घरी जात असताना कारमधून धूर येताना त्यांना दिसला. त्यामुळे गाडी थांबवून ते दूर गेले. त्यानंतर लगेचच कारने पेट घेतला. जेएसडब्ल्यू कंपनीच्या अग्निशमन पथकाने दीड तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. या आगीत कार पूर्णपणे जळून खाक झाली. या कारमध्ये नेमकी किती प्रवासी प्रवास करत होते याची माहिती मिळू शकली नाही. या घटनेची नोंद पोयनाड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
























































