रामटेक-भंडारा रस्त्यावर कारची ट्रकला मागून धडक, भीषण अपघातात तिघांचा दुर्दैवी मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रामटेक-भंडारा रस्त्यावरील आरोली खंडाळा गावाजवळ रविवारी एक भीषण अपघात झाला. रस्त्यावर उभ्या असलेल्या एका ट्रकला कारने मागून धडक दिली व या भीषण अपघातात तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. रामटेक येथून देवदर्शन आटोपून भंडारा येथे परतत असताना रामटेक-भंडारा रस्त्यावरील आरोली खंडाळा गावाजवळ उभ्या असलेल्या ट्रकवर कार आदळली.

राजेश परसराम भेंडारकर (34), दुर्गा राजेश भेंडारकर (32), मेघा चंद्रहास बोंद्रे (31), परसराम लहानू भेंडारकर (70), सीताबाई परसराम भेंडारकर (64), हिमांशू राजेश भेंडारकर (8 महिने), उन्नती राजेश भेंडारकर (५) भार्गवी चंद्रहास बोंद्रे (08) व भव्य चंद्रहास बोंद्रे (8) सर्व सोनकापलास गाव ते. साकोली जि. भंडारा येथील रहिवासी आहेत. हे सर्वजण एमएच-36/एच-8403 क्रमांकाच्या कारने रामटेक येथे देवदर्शनासाठी गेले होते. दर्शन करून परतत असताना दुपारी 3.30 च्या सुमारास रामटेक-भंडारा रस्त्यावरील आरोली खंडाळा गावाजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एमएच-40/सीडी-9802 क्रमांकाच्या ट्रकला कारने मागून धडक दिली.

यावेळी कार राजेश भेंडारकर चालवत होते. ही धडक इतकी जोरदार होती की कारमधील सर्व जण गंभीर जखमी झाले. जखमींना रामटेकच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. येथे उपचारादरम्यान लहानू भेंडारकर (70) यांचा मृत्यू झाला. इतरांची प्रकृती गंभीर असल्याने सर्वांना नागपुरातील मेया रुग्णालयात नेण्यात आले. हिमांशू भेंडाकर आणि भार्गवी बोंद्रे या चिमुकल्यांचा रात्री उशिरा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आरोली पोलिसांनी ट्रक क्र एम एच 40 सी डी 9403 या ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.